Wed, Jan 29, 2020 22:56



होमपेज › Konkan › तिलारी रामघाट दुरुस्तीचे 3 कोटी पाण्यात!

तिलारी रामघाट दुरुस्तीचे 3 कोटी पाण्यात!

Published On: Jul 19 2019 2:16AM | Last Updated: Jul 18 2019 10:32PM




तिलारी रामघाट गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने खचून वाहून गेल्याने हा घाट अनिश्चित कालावधीसाठी वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.गेल्यावर्षी 3 कोटी 84 लाख रुपये खर्चून हा घाट वाहतुकीस सुस्थितीत बनविण्यात आला. परंतु संरक्षक कठड्याच्या अगदी लगतच खासगी कंपनीची केबल टाकण्यासाठी खोदाई करण्यात आल्याने असलेले संरक्षक कठडे व रस्ता कमकुवत बनल्याने व रस्त्यावरुन होणारी ओव्हरलोड वाहतूक अशा अनेक कारणांनी या रस्त्याची दुर्दशा झाली. ठेकेदाराने केलेला मनमानी कारभार व सा.बां. विभागाने केलेले दुर्लक्षामुळे  हा घाट बंद झाल्याने याचा फटका वाहनचालकांना बसला आहे.

वाहतुकीसाठी मारावा लागतो वळसा

साटेली-भेडशी तसेच दोडामार्ग याठिकाणी भाजी विक्रेते बेळगावहून तिलारीघाटमार्गे  वाहतूक करतात. परंतु हा घाट बंद झाल्याने त्यांना चोर्ला-गोवा घाटमार्गे वाहतूक करावी लागत असल्याने भाज्यांचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. उदा.कोंथबीर पेंडी ही 20ते30रुपयाला मिळत होती.तर तिचा दर आता दुप्पट होवून 60 रु. इतका झाला आहे. याचा त्रास आता ग्राहकांना सोसावा लागत आहे. चंदगड येथून शेकडो ब्राँयलर कोंबड्यांची वाहतूकही या मार्गे केली जात होती. परंतु याचा मार्गदेखील बदलल्याने याचा त्रास कोंबडी पुरवठा करणार्‍या व्यापार्‍यांना सहन करावा लागत आहे.वाहतुकीचे अंतरदेखील वाढल्याने दरात देखील फरक पडला आहे. साटेली-भेडशी ,दोडामार्ग तसेच गोवा येथील बरेसचे व्यापारी हे व्यापारासाठी बेळगाव, कोल्हापूर याठिकाणी जातात. ते देखील या घाटातूनच जात असत. परंतु हा घाटच बंद झाल्याने त्यांना देखील वळसा मारुन जावे लागत आहे.       

अन्य राज्यातील पर्यटकांनाही फटका

आंध्रप्रदेश, तेलंगणा,कर्नाटक या राज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात गोवा तसेच सिंधुदुर्गातील पर्यटन पाहण्यासाठी येतात. परंतु ते परत जात असताना त्यांच्या जीपीआरएस सिस्टिममध्ये तिलारी घाटमार्ग जवळ दाखवत असल्याने ते या घाटातून जाण्यासाठी निघतात. परंतु हा घाट बंद असल्याची कल्पना नसल्याने ते सरळ घाटाच्या पायथ्याशी जातात. परंतु तेथे मातीचा ढिगारा असल्याने तेथून परतून सुमारे 30 कि.मी.अंतर पार करुन दोडामार्ग येथून गोवामार्गे जातात. त्यामुळे पर्यटकांचा गोंधळ उडत आहे.        

वाहतुकीचे अंतर वाढले

साटेली-भेडशी बाजारपेठेतून कोल्हापूर येथे जाण्यासाठी तिलारी घाटमार्गे  180 किलोमीटर एवढे अंतर असून आंबोलीमार्गे गेल्यास हेच अंतर सुमारे 220 किलोमीटर एवढे होते. त्यामुळे 40किमी. एवढे अंतर वाढते. तर बेळगाव येथे चोर्ला घाटमार्गे जाण्यासाठी 30 ते 35 किमी. अंतर वाढते. त्यामुळे इंधनाचे प्रमाण देखील जास्त लागते तर वेळदेखील जास्त खर्च करावा लागतो.             

घाट रस्ता बंद झाल्याने वाहतुकीचे वाढलेले अंतर पाहता व्यापारी वर्गाला वळसा मारुन व्यापारासाठी जावे लागणार असल्याने वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे वस्तुच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.                       

घाटातील आणखी काही दरडी कोसळण्याच्या स्थितीत घाटातील आणखी काही दरडी या झाडांबरोबर खाली कोसळण्याच्या स्थितीत असल्याने आणखी भीती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी गटारांची व्यवस्था नसल्याने पाण्यामुळे झाडांची मुळे निकामी झाली आहेत.परिणामी काही ठिकाणी छोट्या छोट्या दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले असून अजूनही काही कोसळण्याच्या स्थितीत आहे.तिलारी घाट बंद झाल्याने अनेक समस्या व प्रश्न निर्माण झाले आहेत. याकडे प्रशासन कधी लक्ष देवून समस्यांचे निरसन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.