Tue, Nov 13, 2018 23:31



होमपेज › Konkan › तिलारी घाटमार्ग उद्यापासून सुरू होणार

तिलारी घाटमार्ग उद्यापासून सुरू होणार

Published On: Feb 03 2018 11:24PM | Last Updated: Feb 03 2018 10:01PM



 दोडामार्ग :  प्रतिनिधी

तिलारी घाटाचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सोमवार 5 फेबु्रवारी पासून हा घाट वाहतुकीस खुला केला जाणार असून वाहनांची वर्दळ देखील घाट रस्ता सुुस्थितीत झाल्याने वाढलेली दिसणार आहे.
घाटाच्या पायथ्याशी 1 बाय 66 मेगावॅट जलविद्युत केंद्राकडे यंत्र सामुग्री नेण्यासाठी तिलारी घाट बनविण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या ताब्यात असलेल्या खाजगी घाटातून सर्व वाहनांना प्रवेश बंद होता.

तरीपण बेळगाव, कोल्हापूर, गोवा येथे जाणारे वाहनचालक या घाट मार्गाचा वापर करू लागले. त्यातच घाटातून गेल्या काही वर्षापासून अवजड वाहनांची प्रचंड वर्दळ वाढल्याने रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला. ठिकठिकाणी खड्डयाचे  मोठे साम्राज्य पसरल्याने वाहने सोडाच पण पायी जाणे देखील धोकादायक बनले होते. रस्ता पाटबंधारे विभागाच्या मालकीचा असून देखील हा विभाग रस्ता दुरुस्तीसाठी निधी खर्च करत नव्हता. तर बांधकाम विभाग हा घाटमार्ग आपल्या ताब्यात नसल्याने दुरुस्तीचे काम हाती घेत नव्हता. मध्यंतरी पाटबंधारे विभागाने हा 7 कि.मी. चा घाट बांधकामकडे वर्ग करण्याचा प्रयत्न केला. पण दुरुस्तीसाठी कोटयावधी रूपयांची गरज असल्याने त्यांनी ताब्यात  घेण्यास नकार दिलेला होता. बांधकामकडे वर्ग करण्याचा प्रयत्न केला. पण दुरुस्तीसाठी कोटयावधी रूपयांची गरज असल्याने त्यांनी ताब्यात घेण्यास नकार दिलेला होता.

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सतत पाठपुरावा केल्यावर तिलारी घाटाबाबत मंत्रालयात बैठक झाली होती. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी पहिल्यांदाच निधीची तरतूद करा आणि त्यानंतर घाटरस्ता बांधकामाकडे वर्ग करा असे सांगितले होते. यानुसार तिलारी पाटबंधारे खाते व तिलारी जलविद्युत केंद्राने मिळून 3 कोटी 34 लाख रूपये निधी सा.बां. विभागाकडे देण्याचे मान्य केले. आणि ते वर्ग झाल्यावर घाटरस्ता कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला. त्यानंतर प्रत्यक्षात दिवाळीनंतर घाटाच्या डांबरीकरणाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. जवळपास 3 महिने घाटदुरूस्ती हा घाटमार्ग बंद होता. प्राप्त निधीतून तिलारी घाटाचे डब्लूबीएम, बीबीएम, कार्पेट व सिलकोट या टप्प्यानुसार खडीकरण व डांबरीकरण घाटाचे करण्यात आले. 7 कि.मी.च्या घाटातील काही अंतराचा रस्ता जुना सुस्थितीत होता.

हा भाग वगळून उर्वरित घाटाच्या रस्त्याचे नवीन डांबरीकरण करण्यात आले. शनिवारी तिलारी घाटाच्या पायथ्यापासून वरपर्यंत पाहणी केली असता रस्त्याचे काम पूर्ण आहे. तसेच बांधकाम विभागाने डांबरीकरणाचे काम दर्जेदार केल्याचे निदर्शनास येते. यामुळे हा घाटमार्ग सोमवार 5 फेबु्रवारी पासून वाहतुकीस खुला होणार आहे. तिलारी घाट 7 कि.मी.चा असून हा मार्ग सुस्थितीत झाला खरा पण नागमोडी वळणावर व तीव्र उतारावर रस्त्यालगत असलेले संरक्षक कठडे कोसळलेल्या स्थितीत जैसे त्या स्थितीतच आहे. अशा कठडयांना दुरुस्त व मजबूत करणे गरजेचे आहे. पण तसे झाले नाही. रस्त्याचे काम दर्जेदार झाल्याने घाटातून खाली येणारी वाहने जलद वेगाने खाली उतरतील. यावेळी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. नाहीतर गंभीर घटना निकामी संरक्षक कठडयाअभावी व्हायला वेळ लागणार नाही.