Thu, Apr 25, 2019 07:35होमपेज › Konkan › सत्तेच्या माध्यमातून कणकवलीचा चेहरामोहरा बदलणार : प्रमोद जठार

सत्तेच्या माध्यमातून कणकवलीचा चेहरामोहरा बदलणार : प्रमोद जठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

केंद्रात व राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आहे. या सत्तेच्या माध्यमातून आम्ही कणकवलीचा सर्वांगिण विकास साधत शहराचा चेहरामोहरा बदलणार आहोत. हा आमचा शब्द आहे आणि तो आम्ही पूर्ण करून दाखवणार आहोत. ज्या पक्षाचे सरकार सत्तेत आहे, त्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यायला हवेत. तरच खर्‍या अर्थाने विकासाला गती मिळेल आणि कामे न झाल्यास जनतेलाही लोकप्रतिनिधींना जाब विचारता येईल. कणकवलीतील जनतेने विकासाचे त्रांगडे होऊ देऊ नये, असे मत भाजप जिल्हाध्यक्ष, माजी आ. प्रमोद जठार यांनी कणकवली नगरपंचायत निवडणूक पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

भाजप-शिवसेना युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रमोद जठार व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते हे प्रचारात सहभागी झाले आहेत. एकूणच कणकवली शहराचा विकास, जिल्हा विकासाचे त्यांचे व्हिजन, प्रचार यंत्रणा याबाबत त्यांनी आपली मते मांडली. प्रमोद जठार म्हणाले, कणकवलीतील अनेक प्रभागात फिरताना आपल्याला लक्षात आले आहे की, येत्या काळात आपल्याला विकासाचा वेग वाढवावा लागेल. जनतेचा संदेश पारकर यांच्या नेतृत्वावर विश्‍वास आहे. विराट कोहलीप्रमाणे ते दमदार खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून देतील यात आपल्याला  शंका नाही. कोणत्याही भूभागाचा विकास व्हायचा असेल तर केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या सरकारचे लोकप्रतिनिधी निवडून यायला हवेत. आता कणकवलीकरांना सुवर्णसंधी आहे ती म्हणजे केंद्र व राज्यातील आमच्या ताकदवान सरकारच्या माध्यमातून या शहराच्या विकासाला भरघोस निधी आणण्यासाठी संदेश पारकर यांच्यासारखा तेवढ्याच ताकदीचा लोकप्रतिनिधी निवडून द्यावा लागेल. कारण कणकवली नगरीची खरी शिल्पकार ही जनताच आहे.

कणकवलीसाठी विकास खेचून आणायचा असेल तर संदेश पारकर व त्यांच्या टीमची गरज आहे. गेल्या अडीच वर्षोत सत्तेच्या माध्यमातून आम्ही या शहरासाठी निधी उपलब्ध करून दिला. मात्र, न. पं. वर सत्ता आल्यानंतर खर्‍या अर्थाने निधीचा ओघ वाढेल. जर इतर मंडळींना ताकद मिळाली तर कणकवलीचा विकासाचा खेळखंडोबा होईल, ते होता कामा नये याची काळजी कणकवलीकरांनी घ्यायला हवी. सरकार एका पक्षाचे आणि लोकप्रतिनिधी दुसर्‍या पक्षाचे अशा राजकीय साटमारीत कणकवलीकरांनी विकासापासून वंचित राहू नये. आज कणकवली विधानसभा मतदारसंघाला याचाच फटका बसत आहे. कारण या मतदार संघात विरोधी पक्षाचा आमदार आहे. जर कणकवलीकरांनी संदेश पारकर व त्यांच्या टीमला संधी दिली तर विकासाच्या बाबतीत जनता त्यांना जाब विचारू शकेल.

कारण राज्यात आमची सत्ता आहे. कणकवली शहराच्या भुयारी गटात योजनेसाठी 30 कोटींची आवश्यकता असून ती होण्यासाठी लोकसंख्येची अट शिथील व्हायला हवी. मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत आग्रह करून भाजप -सेनेची  युती करायला लावली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री या सर्व अडचणी दूर करतील, क्रीडांगण व अन्य आरक्षित जागा संपादन तसेच विकासकामांसाठी या शहराला 100 ते 150 कोटी रु. निधीची आवश्यकता आहे आणि तो निधी देण्याची ताकद केंद्र व राज्यातील आमच्या सरकारमध्ये आहे, असे प्रमोद जठार म्हणाले. 

ते म्हणाले, आ. नितेश राणे म्हणतात आपण देवगड, वैभववाडीचा विकास केला. वॅक्स म्युझियम आणि कंटेनर मधील थिएटर म्हणजे विकास नाही. आ. राणेंची विकासाची कल्पना बाळबोध आहे. नितेश राणे यांनी किती लोकांना रोजगार दिला? आज सिंधुदुर्गला मोठ्या ब्रेकची म्हणजे रोजगाराच्या मोठ्या प्रकल्पांची गरज आहे. हा रोजगार बंदर विकासाच्या माध्यमातून, ग्रीन रिफायनरीसारख्या प्रकल्पांतून उपलब्ध होणार आहे. गेली 25 वर्षे जनतेने राणेंकडून केवळ विकासाच्या घोषणाच ऐकल्या. त्यांचा उतावळीपणा हा सिंधुदुर्गाच्या विकासाला मारक ठरला. त्यांच्या भूलथापांना आता जनतेने बळी पडू नये, असे प्रमोद जठार म्हणाले. 

कणकवलीत आम्ही नियोजनबध्द प्रचारयंत्रणा राबवत आहोत. जनतेचाही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केलेली विकासकामे आणि याही पुढे सत्तेच्या माध्यमातून केला जाणारा विकास यामुळे यश निश्‍चित आहे, असा विश्‍वास प्रमोद जठार यांनी व्यक्‍त केला. 

Tags : Through the power Kankavali will be developed says Pramod Jathar


  •