Sat, Jul 20, 2019 10:35होमपेज › Konkan › रसायन अंगावर पडून  तीन कामगार भाजले

रसायन अंगावर पडून  तीन कामगार भाजले

Published On: May 18 2018 11:16PM | Last Updated: May 18 2018 11:12PMचिपळूण : खास प्रतिनिधी

लोटे एमआयडीसीतील कृष्णा अँटिऑक्सिडंट कंपनीमध्ये रिअ‍ॅक्टरचे काम करीत असताना तीन कामगार भाजून जखमी झाले आहेत. या घटनेने पुन्हा एकदा लोटे औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.  शुक्रवारी सकाळी 10 वा. च्या सुमारास या कंपनीतील नरेश धोंडू देवरूखकर (33, रा. खडपोली), संजय राजाराम नलावडे (31, रा. दळवटणे), ज्ञानेश्‍वर राजाराम सोंडकर (55, रा. आवाशी) हे तिघेजण होरपळून जखमी झाले आहेत. रिअ‍ॅक्टरच्या नॉबचे काम करीत असताना त्यातील रबरी कव्हर अचानक निघून रसायन त्यांच्या अंगावर पडले. त्यामध्ये ते होरपळले. त्यांच्या हाताला, तोंडावर रसायन उडाल्याने ते भाजले आहेत. त्यांना तत्काळ चिपळुणातील लाईफ केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून जीविताला धोका नसल्याचे तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. 

दरम्यान, या प्रकरणाची दखल सुरक्षा विभागाने घेतली असून अपघाताची चौकशी या विभागाकडून करण्यात येणार आहे. लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये सातत्याने कामगार जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. रसायन अंगावर पडून, स्फोट होऊन, आग लागण्याच्या घटना घडत आहेत. मात्र, त्या दृष्टीने लोटे एमआयडीसीमध्ये सुरक्षा यंत्रणा नाही.  त्यामुळे येथील कामगार संघटना औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांचे सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी करीत आहेत.

‘रेव्हीन’ उडाल्याने दुर्घटना...
कृष्णा अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट प्रा. लि. ही कंपनी पेट्रोकेमिकलसाठी रसायने तयार करते. रेव्हीन नावाचे रसायन उडून तीन कामगार जखमी झाले. रिअ‍ॅक्टरचा चोकअप काढत असताना अचानक हे रसायन बाहेर आल्याने ही दुर्घटना घडली.