होमपेज › Konkan › फोटो काढण्याच्या नादात तरुण कोसळला 800 फूट दरीत

फोटो काढण्याच्या नादात तरुण कोसळला 800 फूट दरीत

Published On: Jun 07 2018 2:06AM | Last Updated: Jun 06 2018 10:53PMआंबोली : वार्ताहर

गोव्याहून आंबोलीमार्गे नाशिक येथे जात असताना आंबोली घाटात दरड कोसळलेल्या ठिकाणी फोटो काढण्याच्या नादात संपत महाले (35, रा. पांडुर्ली, ता. सिन्‍नर, जि. नाशिक) हा पाय घसरल्याने सुमारे 800 फूट खोल दरीत कोसळला. ही घटना घडताच त्याच्यासोबत असलेली त्याची पत्नी व अन्य नातेवाईकांनी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन करून घटनेची माहिती देताच रुग्णवाहिकेचे डॉक्टर सुरजीत पांडव यांनी आंबोली पोलिस ठाणे व आपत्कालीन पथकाला दिली. त्यानंतर तत्काळ आंबोली पोलिस व आपत्कालीन पथकाने घटनास्थळी दाखल होत दरीत कोसळलेल्या संपत महालेचा दरीत उतरून शोध घेतला. यावेळी खोल दरीत संपत महाले हा गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला.त्याला रात्री 8.30 च्या सुमारास  सुखरूपपणे आपत्कालीन पथकाने बाहेर काढण्यात यश मिळविले. ही घटना बुधवारी सायंकाळी 4 वा. च्या सुमारास घडली. 

पांडुर्ली-सिन्नर येथील संपत महाले, त्याची पत्नी छाया महाले, सहा वर्षाचा मुलगा कृष्णा, तीन वर्षाची मुलगी परी तसेच संपत महाले यांचे मित्र अक्षय शेळके, त्यांची पत्नी माधुरी शेळके असे कुटुंब स्विफ्ट कारने गोवा येथे पर्यटनासाठी गेले होते. गोवा येथे पर्यटन झाल्यानंतर बुधवारी हे कुटुंब आंबोली मार्गे नाशिक येथे माघारी जात असताना आंबोली घाटात मुख्य धबधब्यापासून सुमारे 1 कि.मी. अंतरावर दरड कोसळलेल्या ठिकाणी हे कुटुंब फोटो काढण्यासाठी उतरले. फोटो काढत असतानाच संपत महाले याचा पाय घसरल्याने तो सुमारे 800 फूट खोल दरीत कोसळला. अचानक घडलेल्याया घटनेमुळे महाले व शेळके कुटुंबीय हादरून गेले. त्यांनी तत्काळ आंबोली येथील 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन करून घटनेची माहिती दिली. रुग्ग्णवाहिकेचे डॉ. सुरजित पांडव यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत याची माहिती आंबोली पोलिस ठाण्यात व आपत्कालीन पथकाला दिली. घटनेचे गांभिर्य ओळखून आपत्कालीन पथकाने सामानासह घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान याचवेळी मनाली येथील साहसी क्रीडा शिबिरासाठी प्रशिक्षणार्थींची निवड करण्यासाठी ओरोस येथून आलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी घटनास्थळी थांबून माहिती घेतली.

आपत्कालीन पथकातील दीपक मेस्त्री, वामन पाळेकर, अजित नार्वेकर, उत्तम नार्वेकर, राकेश अमरूसकर, सिंधुदुर्ग अ‍ॅडव्हेंचरचे कमलेश चव्हाण, तसेच पोलिस हवालदार गजानन देसाई यांनी दरीत उतरून संपत महाले याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता संपत महाले हा खोल दरीत गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. सायंकाळी पावसाचे वातावरण असल्यामुळे जखमी असलेल्या संपत महाले याला वरती काढण्यासाठी अडचणी येत होत्या. दरम्यान रात्रौ साडेआठच्या सुमारास संपत महाले याला सुखरूपपणे दरीबाहेर काढण्यात आपत्कालीन पथकाला यश आले. संपत महाले सुखरूप असल्याचे दिसताच त्यांच्या पत्नीने व सोबत असलेल्या इतरांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. दरीतून बाहेर काढल्यानंतर त्याला  उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.