Sun, Dec 08, 2019 18:38होमपेज › Konkan › जि. प. शाळांत सव्वाबारा हजार मुले करणार ‘श्रीगणेशा’ 

जि. प. शाळांत सव्वाबारा हजार मुले करणार ‘श्रीगणेशा’ 

Published On: May 23 2019 1:42AM | Last Updated: May 23 2019 1:42AM
रत्नागिरी ः प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये 2019-20 या शैक्षणिक वर्षात पहिलीत 12 हजार 288 संभाव्य मुले श्रीगणेशा करणार आहेत. यामध्ये 6212 मुले तर 6076 मुलींचा समावेश आहे. सोमवार दि. 17 जूनपासून शाळा मुलांच्या किलबिलाटाने गजबजणार आहेत. 

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना नियमित शाळेत शंभर टक्के पटनोंदणी, शंभर टक्के उपस्थिती, टिकविणे व सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. शाळेत प्रवेश घेताना बालकाला उत्साहवर्धक आणि आनंददायी वातावरण दिसले तर त्याचा शाळेचा ओढा वाढेल. या पार्श्‍वभूमीवर शाळेच्या प्रथम दिवशी आणि शाळापूर्व दिवशी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून गावागावात पहिली प्रवेशासाठी आणि पटसंख्या टिकविण्यासाठी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक प्रयत्न करत होते. शाळेच्या आधी एक दिवस सर्व शाळांमध्ये शैक्षणिक पदयात्रा, गृहभेटी करण्यात येणार असून, यामध्ये शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्याचा सहभाग घेणेत येईल. दाखलपात्र मुलांच्या घरी जाऊन मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे.

शाळा सुरू होण्यापूर्वी शालेय स्वच्छता, पिण्याच्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता, शालेय परिसर स्वच्छता, तसेच स्वच्छतागृहाची स्वच्छता करणेत येणार आहे.  विद्यार्थ्याला शाळेत पाठविण्याबाबत पालकांचे समुपदेशन घेण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त अद्यापही शाळेत दाखल न झालेली मुले तसेच सतत गैरहजर असणारी मुले आढळून आल्यास त्यांचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन बालरक्षकांमार्फत करुन त्यांनाही शाळेत दाखल करण्यात येणार आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी आमदार, खासदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते मुलांचे स्वागत करण्यात येणार आहे. सर्व मुलांना शाळेत दाखल करण्याबाबतच्या घोषणा देण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तक वितरण, मुलांचे फुले व खाऊ देऊन स्वागत करण्यात येणार आहे. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत गोड पदार्थ वाटप केले जाईल.