Tue, May 21, 2019 00:54होमपेज › Konkan › साडेचार हजार कुटुंबांचा ‘रिफायनरी’ला विरोध

साडेचार हजार कुटुंबांचा ‘रिफायनरी’ला विरोध

Published On: Jan 26 2018 12:26AM | Last Updated: Jan 26 2018 12:13AMराजापूर : प्रतिनिधी

रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात संघर्ष करणार्‍या स्थानिक जनतेला भक्‍कम पाठिंबा देत शिवसेनादेखील विरोधात राहिली आहे. हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत हद्दपार झालाच पाहिजे, त्यासाठी शिवसेना सज्ज आहे. प्रकल्पबाधित 5 हजार  रेशनकार्डधारकांपैकी सुमारे  साडेचार हजार कार्डधारकांनी प्रकल्पाला विरोध असल्याची पत्रे आमच्याकडे दिली आहेत. ती पत्रे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊन हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी राजापुरात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेत प्रकल्प परिसराचा दौरा करणार असल्याचेही आ. साळवींनी स्पष्ट केले. रिफायनरी प्रकल्पावरुन जोरदार वादळ उठले असून आरोप - प्रत्यारोपांच्या नौबती झडत आहेत. या प्रकल्पावरुन शिवसेनेवर टीका होत असून त्या पाश्‍वर्र्भूमीवर आ.साळवी यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर होत असलेली टीका खोडून काढली. ज्यावेळी रिफायनरी प्रकल्प आला तेव्हापासून शिवसेनेने विरोधाची भूमिका घेतलेली आहे. या प्रकल्पाच्या अधिसूचनेवर सुभाष देसाई यांची सही असली तरी गेल्या जून महिन्यात आम्ही त्या अधिसूचनेची जाहीर होळी केली होती. या प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असल्याने शिवसेना देखील स्थानिक जनतेसमवेत असून कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प जोवर रद्द होत नाही, तोवर आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दांत सेना प्रकल्पविरोधी असल्याचे आ. साळवींनी सांगितले. त्यानंतर  उद्धव ठाकरे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, मंत्रीगण व लोकप्रतिनिधी यांच्यासह प्रकल्प परिसराचा दौरा करणार असल्याचे आ. साळवी म्हणाले.
 

साडेचार हजार कार्डधारकांचा विरोध
प्रकल्प परिसरातील सुमारे पाच हजार रेशन कार्डधारकांपैकी साडेचार हजार कार्डधारकांचा रिफायनरी प्रकल्पाला जोरदार विरोध असून त्या सर्वांची या प्रकल्पाला संमती नसल्याची पत्रे आमच्याकडे देण्यात आली आहेत. त्या सर्व पत्रांचा गठ्ठा फेब्रुवारी महिन्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली उद्योगमंत्री सुभाष देसाई, खा. विनायक राऊत, ना. रामदास कदम आदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील. तो गठ्ठा त्यांना दिला जाईल. रिफायनरीला असलेला विरोध दर्शवून तो प्रकल्प तात्काळ रद्द केला जावा, अशी मागणी करणार असल्याची माहिती आ. साळवी यांनी दिली.