Thu, Jul 18, 2019 17:05होमपेज › Konkan › ...हे तर पोलिसांचे अपयशच : कन्हैया पारकर

...हे तर पोलिसांचे अपयशच : कन्हैया पारकर

Published On: Feb 28 2018 1:15AM | Last Updated: Feb 27 2018 11:03PMकणकवली : शहर वार्ताहर 

कणकवली नगरपंचायतीचा उपनगराध्यक्ष म्हणून शहर विकासाचे काम करत असताना ते विरोधकांना रुचले नसल्याने आपली बदनामी करण्याच्या हेतूने मुंबईहून एजन्सी मार्फत आलेल्या महिलेकडून माझ्या विरोधात खोटी तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली. या खोट्या तक्रारीतून माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन आखला गेला. यामागे कोणाचा अदृश्य हात आहे, याबाबत पोलिसांना आपण पुरावे देऊनही अद्याप संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. हे पोलिसांचे अपयश आहे. गृहराज्यमंत्र्याची पोलिस यंत्रणा कोणाच्या दबावाखाली आहे हे जनतेसमोर आले पाहिजे, पोलिसांनी जनतेसमोर सत्य आणावे, असे उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी संगितले. 

कणकवली न.पं.च्या आपल्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, आपल्या परोपकारी स्वभावाचा फायदा घेण्याचे हे षडयंत्र सोशल मीडियाव्दारे आखण्यात आले. ती महिला कोण होती? ती राहण्यास असलेल्या लॉजचे बुकिंग कोणाच्या नावाने होते? याचे पुरावे आपण पोलिसांकडे दिले आहेत. लोकशाहीला काळीमा फासणारे खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करण्यात आले. यामुळेच सुसंस्कृत व्यक्‍ती राजकारणापासून अलिप्त होत आहेत. जिल्हयाच्या राजकीय पटलावरील गुंडगिरी, दहशत, हप्तेखोरीचे मांडलेले दुकान आता बंद होण्याची वेळ आली आहे. कणकवली न.पं.निवडणुकीतून याची सुरवात होणार आहे. 

संदेश पारकर यांनी काँग्रेस व राणेंपासून फारकत घेण्याचा निर्णय कणकवली शहरातील व जिल्ह्यातील जनतेला अपेक्षित होता आणि तो नियतीने घडवून आणला. राणेंकडून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची अपेक्षा आहे. त्यांनी टीका टिपणी करणे सोडून द्यावे. संदेश पारकर यांच्यासमवेत आम्ही कार्यकर्ते जनतेने हाक दिली की त्यांच्या घरापर्यंत गेलो आहोत. समाजसेवेत आपण नौटंकी करत नाही. आम्हाला जेव्हा गरज तेव्हा जनतेचे दर्शन हे संस्कार संदेश पारकर यांनी आमच्यावर केले नाहीत. तसेच निवडणूक आली की दोन महिने लोकांचे मनोरंजन करणे हे लोकशाहीला घातक आहे. पारकरांचे समाजसेवेचे काम वर्षाचे बाराही महिने सुरु रहाणार आहे. गेली 25 वर्षे कणकवलीवासीयांची सेवा करून नागरिकांना साथ देण्याचे काम संदेश पारकर यांनी केले आहे. त्यामुळे विरोधकांकडून केल्या जाणार्‍या टीकांवर सूज्ञ नागरिक विश्‍वास ठेवणार नाहीत असा विश्‍वास कन्हैया पारकर यांनी व्यक्‍त केला.