Thu, Dec 12, 2019 09:28होमपेज › Konkan › महिलेच्या पोटातून काढला साडेनऊ किलोचो ट्यूमर

महिलेच्या पोटातून काढला साडेनऊ किलोचो ट्यूमर

Published On: Jun 16 2019 1:47AM | Last Updated: Jun 15 2019 10:38PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्हा शासकीय रुग्णालयाबाबत नेहमीच अनेक तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र,डॉक्टरांची संख्या कमी असूनही रुग्णांवर चांगले उपचार करण्यासाठी कर्मचारी व डॉक्टर धडपडत असतात. खासगी रुग्णालयात नाकारण्यात आलेली एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर यशस्वी केली. एका महिलेच्या पोटातून चक्‍क साडेनऊ किलो वजनाचा गर्भाशयाचा ट्यूमर बाहेर काढण्यात आला.

तब्बल सात वर्ष आजाराशी झुंज देणार्‍या महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांमुळे दिलासा मिळाला आहे.  जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर बोल्डे  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर विनोद सांगवीकर यांनी ही शस्त्रक्रिया केली.

शीला दत्ताराम हळदणकर (वय 35)  त्या अपंग असून जयगड नजीकच्या कचरे गावातील आहे. अपंगत्वामुळे पोट एका बाजुला वाढले होते. मात्र यात गाठ असेल असे त्यांना वाटले नव्हते. अधूमधून त्यांचे पोट दुखत असे. मात्र प्राथमिक औषध उपचारामुळे ते थांबत असे. महिनाभरापूर्वी त्यांनी स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्यावर वैद्यकीय चाचण्या केल्या. त्यावेळी पोटात मोठी गाठ असल्याचे निष्पन्‍न झाले. 

त्यानंतर त्यांनी शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू केले.  तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. शस्त्रक्रियेसाठी दाखल केल्यानंतर अखेरच्या क्षणी ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने येथे होणार नाही असे सांगतानाच मुंबई किंवा पुणे येथील मोठ्या रुग्णालयात जावे लागेल असा सल्ला खाजगी वैद्यकीय अधिकारी दिला. त्यामुळे हळदणकर कुटुंबीय परत आपल्या घरी गेले होते. दोन दिवसापूर्वीच शीला हळदणकर यांना घेऊन नातेवाईक जिल्हा रुग्णालयात आले होते डॉ विनोद सांगवीकर यांनी रुग्णाची तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अवघड व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्याने त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बोल्डे यांच्याशी चर्चा केली त्यांनीही आपण स्वतः शस्त्रक्रियेसाठी येऊ असे सांगितले. शीला हळदणकर यांच्यावर शनिवारी सकाळी शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले .

शनिवारी सकाळी साडेदहा वाजता शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. अडीच तासांच्या अथक प्रयत्नाने गर्भाशयाच्या पिशवी जवळील साडेनऊ किलोचा ट्युमर बाहेर काढण्यात वैद्यकीय अधिकार्‍यांना यश आले. ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची होती. गाठ मोठी असल्याने अनेक छोट्या रक्तवाहिन्या त्याला जोडल्या गेल्या होत्या. त्या सर्वप्रथम बाजूला करून ट्युमर काढण्याचे आव्हानात्मक काम डॉक्टर विनोद सांगवीकर व डॉ बोल्डे यांनी यशस्वी केले. जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रथमच एवढी मोठी शस्त्रक्रिया करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या या धाडशी प्रयत्नाचे रत्नागिरी नगरपालिकेचे पाणी सभापती सोहेल मुकादम यांनी कौतुक केले आहे दोन्ही वैद्यकीय अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. शीला हळदणकर यांना होणार्‍या त्रासातून वैद्यकीय अधिकार्‍यांनी मुक्‍ती दिल्याने कुटुंबियांनीही सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचे आभार मानले.