Mon, Jul 22, 2019 14:01होमपेज › Konkan › चोरट्यांना केले युवकांनी जेरबंद 

चोरट्यांना केले युवकांनी जेरबंद 

Published On: May 13 2018 2:15AM | Last Updated: May 12 2018 11:10PMसावंतवाडी : शहर वार्ताहर

दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र व अन्य सोन्याचे दागिने घेऊन पळून जाणार्‍या दोघा चोरट्यांना माडखोल येथील युवकांनी थरारक पाठलाग करून पकडले. माडखोल येथून पळणार्‍या या चोरट्यांना आंबोली-आजरा फाटा येथे पकडण्यात आले. शनिवारी दुपारी 12च्या दरम्यान हा प्रकार घडला. या चोरट्यांचे अन्य दोघे साथीदार चोरलेले दागिने घेऊन पसार झाले.पकडण्यात आलेले दोन्ही चोरटे बिहार येथील असून धीरजकुमार परमानंद साह (वय 25) व राकेशकुमार सुरजनसहा साह(वय 39) अशी त्यांची नावे आहेत. 

यामागे मोठे टोळके सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांना आहे.पकडलेल्या दोघांकडे एक मंगळसूत्र व चैन सापडली आहे. ती अन्य ठिकाणी झालेल्या चोरीतील असल्याचा संशय व्यक्‍त केला जात आहे.
माडखोल धवडकी येथे दोघे संशयित दागिने पॉलिश करण्यासाठी फिरत होते. धवडकी येथे राहणार्‍या जयश्री रामचंद्र राऊळ यांच्या घरी जाऊन या दोन्ही संशयितांनी आपण सोन्याचे दागिने,तांब्याची भांडी व अन्य वस्तू पॉलिश करून देतो असे सांगितले.

जयश्री राऊळ यांच्या मुलीची पैंजण त्यांनी प्रथम पॉलिश करून दिली. तुमचेही दागिने खराब झाले असून ते पॉलिश करून घ्या, असे सांगून त्या दोघांनी राऊळ यांना ते दागिने प्रथम हळदीच्या पाण्यात व नंतर कुकरमध्ये गरम पाण्यात टाकण्यास सांगितले. नंतर राऊळ यांना पाणी आणण्यासाठी पाठवून त्या दोघांनी दागिने घेऊन पळ काढला.

जयश्री राऊळ यांनी या घटनेची माहिती लागलीच आपल्या नातेवाईकांना दिली. राऊळ यांचे जावई व माडखोल येथील युवकांनी स्विफ्ट कारमधून थरारक पाठलाग करून चोरट्यांना आंबोली-आजरा फाटा येथे पकडले.

थरारक पाठलाग....

दागिने घेऊन पळ काढणार्‍या त्या दोघांचा निखिल सावंत, पंकज राणे, अनिल परब व दत्ताराम देसाई यांनी यांनी थरारक पाठलाग केला.दुचाकीवरून पळणार्‍या त्या दोघांनी प्रथम माडखोल येथे एका ग्रामस्थास उडविले. यात ग्रामस्थ जखमी झाला. त्याला त्या दोघा युवकांनी पैसेही दिल्याचे समजते.चोरटे दागिने घेऊन पळत असल्याची माहिती आंबोली पोलीस दूरक्षेत्रात देण्यात आली. आंबोली चेकपोस्टवर चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न पोलिसानी केला. मात्र, चोरटे पळून गेले. चोरट्यांनी हिरण्यकेशी येथे जाऊन कपडेही बदलले. त्यानंतर कोल्हापूरच्या दिशेने ते सुसाट निघाले. मात्र, त्यांच्या मागावर असलेल्या माडखोल येथील युवकांनी त्यांना आजरा फाटा येथे पकडले.त्यानंतर सहायक पोलिस उपनिरीक्षक विश्‍वास सावंत व गजानन देसाई यांनी त्यांना ताब्यात घेऊन सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणले.

मोठे टोळके : अन्य चोरीच्या घटनात सहभागाची शक्यता...

पकडण्यात आलेल्या त्या दोघांकडून जयश्री यांचे चोरी केलेले दागिने सापडले नाही. या चोरट्यांचे अन्य दोन साथीदार असून  ते टीव्हीएस-आपाची दुचाकीने पळून गेल्याचे काहींनी बघितले. या चोरट्यांचे साथीदार माडखोल येथे चोरलेले दागिने घेऊन पसार झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यात अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. यात हे टोळके सक्रिय असण्याचा संशयही पोलिसांना आहे. त्या दृष्टीने तपास केला जात आहे. दरम्यान, पकडलेल्या दोघांकडे एक मंगळसूत्र व चैन सापडली असून त्यांच्याकडे असलेली पल्सर दुचाकी सातारा येथील आहे. तीही चोरीची असण्याची शक्यता आहे. पकडण्यात आलेले दोघे आंबोली येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये काही दिवसापासून थांबले होते, अशीही माहिती समोर आली आहे. ज्या धाडसाने माडखोल येथील युवकांनी त्या दोघा चोरट्यांना पकडले त्यांचे कौतुक होत आहे.