Mon, Jan 27, 2020 12:52होमपेज › Konkan › वैभववाडी तालुक्यात पुन्हा महिलांना लुटले

वैभववाडी तालुक्यात पुन्हा महिलांना लुटले

Published On: May 18 2019 1:44AM | Last Updated: May 17 2019 11:26PM
वैभववाडी : प्रतिनिधी

अज्ञात चोरट्याने लोरे येथे एका हॉटेल व्यवसायिक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे  मंगळसूत्र व चेन, तर त्याचदरम्यान नाधवडे-नवलादेवी येथे घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेऊन पोबारा केला. या दोन्ही घटना शुक्रवारी दुपारी 1.30 ते 2.वा.सुमारास घडल्या. महिनाभरापूर्वीही कोकिसरे-बांधवाडी येथील वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने अज्ञात चोरट्याने हिसकावून नेले होते. या वाढत्या चोरी प्रकारामुळे महिलांमध्ये भीती पसरली आहे. 

लोरे नं. 2 येथे ग्रामपंचायतीसमोर सौजन्या धाकोजी सुतार यांचा टी स्टॉल आहे. शुक्रवारी दुपारी अज्ञात मोटारसायकलस्वार स्टॉलजवळ आला.  त्याने वडापाव घेतला आणि बोलता बोलता कुडाळ, सावंतवाडीला कसे जायचे, असे विचारत बेसावध असलेल्या सौ. सुतार यांना काही समजायच्या आतच गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व चेन खेचून काही सेकंदात तिथून पोबारा केला. तर अर्ध्या तासाच्या अंतराने  नाधवडे-नवलादेवी येथील प्रमिला प्रकाश परब या महिलेच्या घरात वीज मीटर रीडिंगच्या बहाण्याने प्रवेश केला व बेसावध असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेऊन मोटारसायकलने पलायन केले. या घटनांमुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण आहे. महिनाभरापूर्वी अशाच प्रकारे कोकिसरे येथे वृध्द महिलेच्या गळ्यातील दागिने घेऊन चोरटा पसार झाला होता. त्याचा शोध अद्याप लागलेला नसताना शुक्रवारी पुन्हा भरदिवसा भरवस्तीत चोरट्याने घातलेला धुमाकूळ पोलिसांसमोर आवाहन आहे.या घटनांची नोंद उशिरापर्यंत पोलिसांत झाली नव्हती.