होमपेज › Konkan › कोकणात ‘नाणार’ला थारा  नाही : आनंदराज आंबेडकर

कोकणात ‘नाणार’ला थारा  नाही : आनंदराज आंबेडकर

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 10:39PMचिपळूण : प्रतिनिधी

केंद्र आणि राज्य सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. सामाजिक तेढ निर्माण होण्यास हे सरकार खतपाणी घालत आहे. त्यामुळे या दोन्ही सरकारांना हटविले पाहिजे. त्यासाठी  रिपब्लिकन सेना आघाडीवर राहील, असा इशारा देत रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी कोकणात नाणार प्रकल्पाला थारा नाही, असेही स्पष्ट केले.

येथील रिपब्लिकन सेनेच्या वतीने सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने आंबेडकर चिपळुणात आले  असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.  केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनाही लक्ष्य केले. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समाजांचे दैवत होते. त्यांना कोणत्याही जाती-पातीत अडकवता कामा नये. ते न्यायी राजे होते. त्यांनी आपल्या प्रजेला स्वाभिमानाने जगण्याचा हक्‍क मिळवून दिला. त्यांची जयंती हा लोकोत्सव व्हावा, याच भावनेतून रिपब्लिकन सेनेने  शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला असल्याचे सांगितले.

भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी बोलताना ते म्हणाले की, या दंगलीमागे जातीय द्वेष पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हेतू होता आणि त्याला या सरकारचे पाठबळही होते, असा जाहीर आरोप त्यांनी यावेळी केला. या प्रकरणी शेकडो दलित बांधवांवर खून आणि दंगलीचे गुन्हे दाखल झाले आहेत. हा सामाजिक अन्याय आहे.हे गुन्हे सरकारने मागे घ्यावेत अन्यथा रस्त्यावरची लढाई लढावी लागेल, असा सरकारला इशारा दिला. 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा समाचार घेताना आठवले म्हणाले की, अन्यायाची जाणीव झाल्यावर डॉ. आंबेडकरांनी खासदारकी आणि मंत्रीपदाचा तत्काळ राजीनामा दिला आणि आज त्यांच्या नावावर मिळालेले मंत्रीपद अत्याचाराच्या घटनेत हे जोपासत बसले आहेत. आठवलेंनी आंबेडकरी विचारधारेशी प्रतारणा केली आहे. या प्रकरणात ते सामाजाविरोधात वागले, असा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला. 

कोकणाला विकासाचा मार्ग आम्ही दाखवू तसेच येथील शेती, फळबागा, मत्स्य उत्पादन यावर आधारित प्रकल्पाचे स्वागत आहे. मात्र, कोकणात नाणार प्रकल्पाला थारा देणार नाही, असे बजावले. येथे पर्यटनपूरक आणि रोजगाराभिमुख प्रकल्प आणा, असे आवाहन करीत कोयनेचे पाणी मुंबई तर नाशिक पाणी मराठवाड्याकडे वळवून दुष्काळ संपवता येईल, असे मतही त्यांनी मांडले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.