Sat, Aug 24, 2019 00:03होमपेज › Konkan › ऐन हंगामात देवरूखमध्ये खत मिळेना

ऐन हंगामात देवरूखमध्ये खत मिळेना

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 25 2018 8:31PMदेवरूख : वार्ताहर

शेतीयोग्य पाऊस बरसत असल्याने बळीराजा शेतीच्या कामात गुंतला आहे. मात्र, शेतीसाठी आवश्यक असलेल्या खताचा संगमेश्‍वर तालुक्यात तुटवडा भासत आहे. खत उपलब्ध असलेल्या ठिकाणी शेतकर्‍यांना तासन्तास ताटकळत उभे रहावे लागत असल्याने शेतकर्‍यांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. याकडे कृषी अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

संगमेश्‍वर तालुका विस्तीर्ण असून ग्रामीण भाग सर्वाधिक आहे. येथील ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. यातून मिळणार्‍या उत्पन्नावरच संसाराचा गाडा हाकला जातो. पावसाळा सुरू झाल्याने शेतकरी शेतीच्या कामात गुंतला आहे. पेरणी केलेले बी चांगल्या पद्धतीने उगवूनदेखील आले आहे. शेतीची उकळ व बेरणीची कामे पूर्णत्वास गेली आहेत. काही ठिकाणी भात लावणीच्या  कामाला जोमाने प्रारंभ झाला आहे.

पेरलेले बी जोम धरण्यासाठी तसेच लावणीवेळी युरिया व काही अंशी सुफला खत टाकले जाते. नाचणीसाठी सुफला खत वापरले जाते. संगमेश्‍वर तालुक्यात सद्य:स्थितीला खताचा तुटवडा शेतकर्‍यांना जाणवत आहे. खत घेण्यासाठी आधारकार्ड सक्तीचे केले आहे. खत वितरणाच्या ठिकाणी खरेदीदाराचे अंगठे घेण्यात येत आहेत. नेट सुविधा सुरळीत नसल्याने यातही अडथळे येत आहेत. 

देवरूख हे तालुक्याचे मुख्य केंद्र आहे. याच ठिकाणी तालुक्यातील शेतकरी गेले चार-पाच दिवस खत मिळवण्यासाठी ये-जा करत आहेत. शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून शेतकर्‍यांनी देवरूख येथील विक्री केंद्रावर गर्दी केली होती. शेकडो शेतकरी रांगेत उभे होते. ऐन हंगामात खतासाठी प्रतीक्षा करावी लागल्याने शेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शेतीबरोबरच काजू, आंबा कलमांसाठी खते शेतकरी घालतात. मात्र, खत मिळत नसल्याने काजू, आंबा बागायतदारांमधून संताप व्यक्त होत आहे. 

खत उपलब्ध करून देण्याची मागणी

एकीकडे शासन शेतकर्‍यांना शेतीकडे वळवण्यासाठी विविध योजना राबवत आहे. तर दुसरीकडे शेतीसाठी आवश्यक खत उपलब्ध नाही, अशी स्थिती देवरुखात आहे. लवकरात लवकर मुबलक खत उपलब्ध व्हावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकर्‍यांमधून होत आहे.