Sun, Jul 21, 2019 10:20होमपेज › Konkan › भडवळेतील एकही कुटुंब वाळीत नाही : सरपंचांचा दावा

भडवळेतील एकही कुटुंब वाळीत नाही : सरपंचांचा दावा

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 9:22PMदापोली : प्रतिनिधी

दापोली तालुक्यातील भडवळे येथील एकही कुटुंब वाळीत नाही. लोंढे कुटुंबीयांना काही कार्यक्रमात बोलवणे देखील आले होते. त्यामुळे बहिष्कृत करण्याचा प्रश्‍नच नाही, असा दावा येथील सरपंच विजय नाचरे यांनी केला आहे. 

या संदर्भात लोंढे कुटुंबीयांची मुंबईतील खोली वाडीतील काही लोकांनी पैसे काढून नावावर करण्याचा निर्णय घेतला. त्याला विरोध केल्यामुळे लोंढे कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला होता, अशी तक्रार वकिलांमार्फत माध्यमातून दापोली पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या संदर्भात सरपंच नाचरे व अशोक रेवाळे यांनी सांगितले. 

या बैठकीत अशाप्रकारचा कोणताही अघोरी निर्णय झालेला नाही. त्यावेळी येथील साईबाबा मंदिर दुरूस्ती आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आदी विषय घेण्यात आले. लालबाग मुंबई येथील सार्वजनिक खोलीचा विषय यावेळी चर्चेला घेण्यात आला होता.

लालबाग येथील सार्वजनिक खोलीतबाबत लोंढे यांनी यापूर्वी येथे राहणार्‍या लोकांना वकिलामार्फत नोटीस पाठविली असून त्याला आम्हीदेखील वकिलामार्फत उत्तर दिले आहे. 1958 साली ही खोली सार्वजनिक म्हणून या खोलीमध्ये राहणार्‍या लोकांनी खरेदी केली आहे. खोलीचा विषय हा वकिलांच्या माध्यमातून सुरू असून लोंढे कुटुंबियांना बहिष्कृत करण्याचा विषय झालेला नाही. 

लोंढे कुटुंब हे गावामध्ये सार्वजनिक कार्यक्रमांत सक्रिय असून गावातील विकासकामांच्या बैठकीला हजर असतात. लोंढे यांनी एकूण बारा जणांवर बहिष्कृत टाकल्याप्रकरणी वकिलांच्या माध्यमातून तक्रार दाखल केली आहे. मात्र, गावात असा विषयच झालेला नसल्याचे नाचरे व रेवाळे यांनी स्पष्ट केले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने या विषयी आणखी स्पष्टीकरण देता येत नसल्याचे देखील यावेळी सरपंच  विजय नाचरे यांच्याकडून सांगण्यात आले.