Tue, Apr 23, 2019 02:14होमपेज › Konkan › नगराध्यक्ष, नगरसेवकांची महावितरण कार्यालयावर धडक

नगराध्यक्ष, नगरसेवकांची महावितरण कार्यालयावर धडक

Published On: Mar 24 2018 1:50AM | Last Updated: Mar 23 2018 9:18PMसावंतवाडी : प्रतिनिधी

शहरातील स्ट्रीट लाईट दुरुस्तीसाठी वीज कर्मचारी उपलब्ध करण्यासाठी सातत्याने मागणी करुनही  महावितरणचे अधिकारी त्याची दखल घेत नसल्याने संतप्त  नगराध्यक्ष बबन साळगावकर व नगरसेवक, नगरसेविकांनी शुक्रवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक देत जाब विचारला. या नंतर  पूर्वीप्रमाणे शहरासाठी दोन कर्मचारी देण्याचे लेखी आश्‍वासन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांनी दिले.

उपनगराध्यक्षा  सौ. अन्नपूर्णा कोरगावकर, आनारोजीन लोबो, सभापती आनंद नेवगी, शिवसेना शहर प्रमुख शब्बीर मणियार, नगरसेविका शुभांगी सुकी, भारती मोरे, माजी सभापती तथा नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, सत्यजित धारणकर, शिवसेना महिला संघटक श्रृतिका दळवी, शिवानी पाटकर,शैलजा पारकर तसेच राजा वाडकर, कुणाल श्रृंगारे, सचिन इंगळे आदी उपस्थित होते.  

सावंतवाडी शहरामधील नगरपरिषदेच्या स्ट्रीटलाईट देखभाल दुरुस्तीसाठी महावितरणकडून दोन वीज कर्मचारी देण्यात आले होते. परंतु, काही दिवसांपूर्वी हे कर्मचारी महावितरणने अचानक काढून घेतले. परिणामी  शहरातील स्ट्रीटलाईट देखभाल दुरुस्ती ठप्प झाल्याने शहरातील सुमारे 300 स्ट्रीट लाईट आज बंद आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना अंधारात चाचपडावे लागत आहे.

या स्ट्रीट लाईटसाठी नगरपरिषद सुमारे 56 लाखांचे वीज बिल भरते. परंतु, त्या बदल्यात महावितरणकडून  सेवा मिळत नसल्याबद्दल नगराध्यक्ष बबन साळगावकर व सर्व नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली.या पदाधिकार्‍यांनी जाब विचारल्यानंतर कर्मचारी पाठवितो, असे उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांनी सांगितले. या उत्तरावर सर्वजण संतप्त झाले. तत्काळ कर्मचारी रवाना करा व तसे लेखी पत्र द्या, अशी मागणी लावून धरल्यानंतर पूर्ववत दोन वीज कर्मचारी स्ट्रीटलाईट देखभाल व दुरुस्तीसाठी दिल्याचे लेखीपत्र दिले. 

महावितरणच्या हेकेखोरपणामुळे सुमारे 300 स्ट्रीटलाईट बंद!  

महावितरण कंपनीच्या हेकेखोरीमुळे सावंतवाडी शहरातील 300 हून अधिक स्ट्रीटलाईट बंदावस्थेत आहेत. परिणामी नागरिकांच्या रोषाला पालिकेला व नगरसेवकांना तोंड द्यावे लागत आहे. महावितरणचे अधिकारी अशा प्रकारे पालिका प्रशासन व जनतेला नाहक त्रास देत असून जनतेच्या कराचा अपव्यय करत असल्याचा आरोप नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला. महावितरणच्या या कारभाराची चौकशी व्हावी, यासाठी आपण वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

न.प.च्या नगराध्यक्ष कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.  उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर, सभापती आनंद नेवगी, शिवसेना शहर प्रमुख शब्बीर मणियार, नगरसेविका शुभांगी सुकी, भारती मोरे, माजी सभापती तथा नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, नगरसेवक मनोज नाईक, विलास जाधव आदी उपस्थित होते.  

शहरातील स्ट्रीटलाईट देखभाल दुरुस्तीसाठी वीज कर्मचारी देण्याच्या मागणीचे पत्र सर्वप्रथम 28 फेब्रुवारीला आपण  महावितरण कंपनीला दिले. त्यानंतर 3 मार्च, 6 मार्च, 13 मार्च आणि अखेरीस 19 मार्च अशी चार स्मरणपत्रे दिली. परंतु, या मागणीकडे महावितरणच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने अखेरीस आम्हा पदाधिकार्‍यांनाच जाब विचारावा लागला. आता पथदीप देखभाल दुरुस्तीसाठी दोन वीज कर्मचारी देण्याचे लेखी आश्‍वासन महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिले आहे. परंतु एकंदरीत महावितरणच्या अधिकार्‍यांचा कारभार मनमानीपणे चालला असून, याची चौकशी करण्याची आपली मागणी असल्याचे श्री. साळगावकर म्हणाले. 

‘जिओ केबल पासून 80 लाखांचे उत्पन्‍न 

शहरातून जाणार्‍या जिओ या खासगी मोबाईल कंपनीच्या केबल खोदाईसाठी नगरपरिषदेला साडेचार हजार रुपये प्रति मीटर दर मिळणार आहे व सुमारे 4 कि.मी. इतक्या क्षेत्रामध्ये ही केबल टाकली जाणार असून यातून नगरपरिषदेच्या खात्यात 80 लाखांहून अधिक निधी मिळणार आहे. महिना अखेर होणार्‍या न.प.च्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय मंजुरीसाठी ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

 

Tags : Sawantwadi, Mahavitaran, electricity, street lighting repair,