Sat, Dec 14, 2019 02:30होमपेज › Konkan › चिपळुणातील ‘त्या’ बेकरीत आगविरोधी यंत्रणाच नाही

चिपळुणातील ‘त्या’ बेकरीत आगविरोधी यंत्रणाच नाही

Published On: Jun 25 2019 1:34AM | Last Updated: Jun 24 2019 11:30PM
चिपळूण : खास प्रतिनिधी

शहरातील बहादूरशेख चौक येथील क्‍वालिटी बेकरीमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. मात्र, हा प्रकार घडल्यानंतर या ठिकाणी सुरक्षाविषयक कोणतीच यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे उघड झाले आहे. या ठिकाणी अग्‍निशमन यंत्रणा नसल्याचे उघड झाले आहे. 

रविवारी सकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास भर वस्तीतील बहादूरशेख नाका येथील क्‍वालिटी बेकरीत बॉयलरचा स्फोट झाला. यामध्ये एक महिला गंभीर जखमी होऊन अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. या महिलेला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरातील लोक हादरले असून या ठिकाणी मोठा अनर्थ घडला असता अशी चर्चा सुरू आहे. बेकरीच्या भटारखान्यामध्ये अनेक सिलिंडर ठेवण्यात आले होते. त्या जवळच असलेल्या बॉयलरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका वाढला असता तर सिलींडरचा मोठा स्फोट होऊन दुर्घटना घडली असती. शिवाय, याच इमारतीच्या वर चिपळूण नागरी सह. पतसंस्थेचे प्रधान कार्यालय आहे. छोट्याशा बॉयलरच्या स्फोटाने ही इमारत हादरली, तर सिलींडरच्या स्फोटाने या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहे. 

दरम्यान या बेकरीमध्ये कोठेही सुरक्षिततेची काळजी घेण्यात आलेली नसून अग्‍निशमन यंत्रणा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  या पार्श्‍वभूमीवर तहसीलदार जीवन देसाई, पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.