Sat, Dec 14, 2019 02:26होमपेज › Konkan › जामसंडेत चोरट्यांचा धुमाकूळ

जामसंडेत चोरट्यांचा धुमाकूळ

Published On: Sep 14 2018 1:30AM | Last Updated: Sep 13 2018 10:45PMदेवगड ः प्रतिनिधी

गणरायाच्या आगमनादिवशीच जामसंडे-टिळकनगर येथील आदर्श कॉलनीत चोरट्यांनी धुडगूस घालून पाच बंगले फोडून सुमारे सव्वा दोन लाखांची रोकड लंपास केली. या घटनेने जामसंडे परिसरात खळबळ उडाली आहे. पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास आदर्श कॉलनी परिसरातील नागरिक साखरझोपेत असताना एकापाठोपाठ एक असे पाच बंगल्यांचे कडी-कोयंडे तोडून चोरट्यांनी दागिने व इतर मौल्यवान वस्तू वगळता रोख रकमेवरच डल्ला मारला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामसंडे-टिळकनगर येथील मराठे हॉस्पिटलच्या मागे असलेल्या आदर्श कॉलनीमधील पाच बंगले चोरट्यांनी गुरुवार, 13 रोजी बंगल्यात कोणीही नसल्याचा डाव साधत फोडले. यामध्ये निवृत्त तलाठी सीताराम जगन्‍नाथ कुळकर्णी, वाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक मनोहर भगत, शिक्षक विकास पवार,  सावंत ऑप्टिशियनचे मालक तुषार सावंत, चंद्रकांत महादेव दहिबांवकर यांच्या बंगल्यांचा समावेश आहे.

यामधील निवृत्त तलाठी सीताराम जगन्‍नाथ कुळकर्णी यांचा आदर्श कॉलनीमध्ये स्वप्नसृष्टी हा बंगला असून ते गणेशोत्सवानिमित्त गावी तळवडे येथे 12 सप्टेंबर रोजी सहकुटुंब गेले होते. हरितालिका असल्यामुळे त्यांची पत्नी व मुलगी समिक्षा ही प्रथम सकाळी 9 वा.च्या सुमारास तळवडे येथे गेली. 

त्यानंतर दुपारी 12 वा.च्या सुमारास कुळकर्णी हे गावी गेले.त्यांच्या बंगल्यामध्ये वरच्या मजल्यावर बँक ऑफ इंडिया मालवण शाखेचे व्यवस्थापक संजयकुमार हे पत्नीसमवेत राहत असून कुळकर्णी यांचा मुंबई येथे असलेला मुलगा तेजस हा गणेशोत्सवादिवशीच येणार होता. पहाटे 3 वा.च्या सुमारास भाड्याने राहत असलेल्या संजयकुमार यांना कुळकर्णी यांच्या घरातील स्नानगृहामधील लाईट लावल्याचा व पाण्याचा वापर केल्याचा आवाज आला. मात्र घरात कोणीतरी असणार असे त्यांना वाटले.

गणेशोत्सवादिवशी तळवडे येथे घरी गणेशाची पूजा करून कुळकर्णी यांची मुलगी समिक्षा ही आदर्श कॉलनीतील त्यांच्या बंगल्याकडे आल्यानंतर तिला मुख्य दरवाजाची कडी तोडल्याचे दिसले. तिने घरात प्रवेश केल्यानंतर खोलीमधील कपाटे उघडून आतील बॅगा, पर्स, कपडे अस्ताव्यस्त टाकल्याचे दिसले. तिने तात्काळ तळवडे येथे घरी फोन करून आई, वडील व भावाला बोलावून घेतले. कपाटांची पाहणी केल्यानंतर कपाटातील सुमारे 54 हजार रूपये रोख रक्‍कम चोरून गेल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी घराच्या वरच्या मजल्यावरील त्यांच्या मुलीच्या खोलीमधीलही कपाट फोडून त्यातील रोख रक्‍कम लांबविली.

चोरट्यांनी केला बाथरूमचा वापर

आदर्श कॉलनीत चोरट्यांनी केलेली चोरी ही हुशारीने केली असून कुळकर्णी यांच्या बंगल्यातील रोख रक्‍कमेची चोरी केल्यानंतर चोरट्यांनी स्नानगृहाचाही वापर केला. तसेच त्यांच्या फ्रिजमधील पाण्याच्या बाटल्या काढून पाणी पिण्यास घेतले व बाटल्या तेथेच टाकल्या. फ्रिजमधील बदामावरही ताव मारला. हात-पाय धुण्यासाठी बाथरूमचा वापर केला.

...अन् बॅटरी विसरून गेले

चोरी करून झाल्यानंतर तेथून पळ काढण्याचा नादात चोरटे त्यांच्याजवळ असलेली बॅटरी कुळकर्णी यांच्या कॉटवरच विसरून गेले.चोरीच्या या घटनेने आदर्शनगर परिसरात एकच खळबळ उडाली.आदर्शनगर कॉलनीचे अध्यक्ष आकाश तांबे यांनीही कुळकर्णी यांच्या घरी धाव घेतली. कुळकर्णी यांचे जावई दत्तगुरू लाड यांनी देवगड पोलिस ठाण्यात कळविल्यानंतर पोलिस निरीक्षक सुधीर शिंदे, पोलिस नाईक प्रशांत जाधव यांनी  घटनास्थळी धाव घेवून पाहणी करून पंचनामा केला.

एकामागोमाग एक पाच बंगले फोडले

कुळकर्णी यांच्या बंगल्याशेजारीच असलेला जामसंडे-तरवाडी येथील चंद्रकांत महादेव दहिबांवकर यांचा मातोश्री बंगलाही चोरट्यांनी फोडून सुमारे 1 लाख 10 हजार रूपये रोख रक्‍कम लांबविली. दहिबांवकर हे गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशीच सायंकाळी घरी आले होते. त्यांनी बंगल्याच्या बाजुने तारांचे पूर्ण कंपाऊंड घालण्यासाठी लागणारी 1 लाख 10 हजार रूपये रोख रक्‍कम कपाटात ठेवली होती. सकाळी कुळकर्णी यांचा बंगला फोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर कुळकर्णी यांनी  दहिबांवकर यांनाही चोरी झाल्याचे कळविताच त्यांनी आपल्या घरी येवून पाहिले. यावेळी त्यांच्याही बंगल्याच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून कपाटातील रोख 1 लाख 10 हजार रूपये चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

मुख्याध्यापक व शिक्षकाचा बंगला फोडला

वाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक मनोहर भगत यांचाही आदर्श कॉलनीत असलेला बंगला चोरट्यांनी फोडला. मात्र ते पुणे येथे गेले असल्यामुळे बंगल्यातून चोरट्यांनी काय चोरून नेले याची माहिती मिळाली नाही. वाडा हायस्कूलचे शिक्षक विकास पवार यांचाही आदर्श कॉलनीत असलेला बंगला चोरट्यांनी फोडला. पवार हे मुंबईला गेले होते. बंगल्यामधील कपाटातील रोख 13 हजार रूपये चोरट्यांनी लांबविले. देवगड नलावडे कॉम्प्लेक्स येथील सावंत ऑप्टिशियनचे मालक तुषार सावंत यांचाही आदर्श कॉलनीत असलेला स्वप्न हा बंगला चोरट्यांनी फोडला. सावंत हे गणेशोत्सवानिमित्त गावी तिवरे-डामरे येथे गेले होते. घर बंद असल्याचा फायदा घेवून चोरट्यांनी सावंत यांचाही बंगला फोडून 25 हजार रूपये लांबविले.

वीसपैकी पाच बंद बंगले फोडले

आदर्श कॉलनीत 20 बंगले असून यामध्ये व्यवसायिक, डॉक्टर, शिक्षक, शासकीय कर्मचारी, अधिकारी यांची घरे आहेत. यामधील पाच बंगल्यांमधील माणसे गावी गणेशोत्सवासाठी गेल्यामुळे बंद घरे चोरट्यांनी फोडली. आदर्श कॉलनीत पाच बंद बंगले फोडल्याचे गणेशोत्सवादिवशी सकाळी 10 वा.निदर्शनास आल्यानंतर प्रथम निदर्शनास आलेल्या कुळकर्णी यांच्या बंगल्यातील चोरीप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर सावंत व दहिबांवकर यांनीही आपल्या बंगला फोडून रोख रक्‍कम चोरट्यांनी चोरून नेल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवारी श्‍वानपथक व ठसेतज्ञ दाखल होणार

जामसंडे आदर्श कॉलनीमधील बंद पाच बंगले फोडल्यानंतर एकच खळबळ उडाली असून गणेशोत्सवामध्ये बहुतांशी पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी असल्यामुळे सध्या पोलिस स्टेशनला असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना घेवून पोलिस निरीक्षक सुधीर शिंदे यांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. चोरीचा तपास करण्यासाठी शुक्रवारी श्‍वानपथक व ठसेतज्ञ जामसंडे आदर्श कॉलनी येथे दाखल होणार आहेत.