Sun, Mar 24, 2019 04:09होमपेज › Konkan › कळंबुशी येथे पाणलोट बंधार्‍यात तरुण बुडाला

कळंबुशी येथे पाणलोट बंधार्‍यात तरुण बुडाला

Published On: Aug 19 2018 11:05PM | Last Updated: Aug 19 2018 10:39PMआरवली : वार्ताहर

संगमेश्‍वर तालुक्यातील कळंबुशी येथील पाणलोट बंधार्‍यात बुडणार्‍या सहकार्‍याला वाचवताना सिद्धेश रवींद्र झगडे हा तरुण रविवारी दुपारच्या सुमारास बुडाला. संध्याकाळी उशिरापर्यंत तो आढळून न आल्याने रात्री उशिरापर्यंत त्याच्यासाठी पोलिस तसेच स्थानिकांमार्फत शोधकार्य सुरू होते. 

कळंबुशी येथील झगडे कुटुंबातील चार तरुण खाचार आगार येथे गावनदीवर बांधण्यात आलेल्या पाणलोट बंधार्‍यात दुपारी 12 वा. सुमारास गुरे घेऊन गेले होते. गेले दोन दिवस कळंबुशी-माखजन परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढल आहे. याचदरम्यान गुरे चारण्यासाठी गेलेल्या सिद्धेशसोबत असणार्‍या हृतिक चंद्रकांत झगडे याला पाण्यात अंघोळ करण्याचा मोह आवडला नाही. त्याने बंधार्‍याच्या पुढे असलेल्या 20 फूट खोल डोहात उडी घेतली. यावेळी हृतिकला पाण्याबाहेर येता न आल्याने तो बुडू लागला. ही बाब सहकारी सिद्धेशच्या लक्षात आल्याने त्याने हृतिकला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. या धडपडीत सिद्धेश झगडे हृतिकला वाचवण्यात यशस्वी झाला. मात्र, दुर्दैवाने सिद्धेश झगडे हा पाण्यात बुडाला. सिद्धेश झगडे हा पट्टीचा पोहणारा होता. त्याने स्वतःला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र त्याचे प्रयत्न अयशस्वी झाले.

या घटनेमुळे घाबरलेले सिद्धेशचे सोबती धावत घरी आले व सर्व हकीगत घरच्यांना सांगितली. काही क्षणातच ही बातमी गावात पसरली. गावकर्‍यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली व शोध कार्य सुरू केले. परिसरात असणार्‍या पट्टीच्या पोहणार्‍यांना पाचारण करण्यात आले. गावकर्‍यांनी घटनास्थळ ते गावनदी ज्या गडनदीला मिळते ते सर्व परिसर पिंजून काढला. सायंकाळी उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते. मात्र, सिद्धेश झगडे सापडू  शकला नव्हता.

दरम्यान, या घटनेची खबर मिळताच संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उडय झावरे, माखजन पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र जाधव, संदीप माणके, मुरुडकर, तुकाराम कुंभार आदी सहकारी घटनास्थळी पोहचले व शोधकार्य सुरू केले.बुडून बेपत्ता असलेला सिद्धेश झगडे 21 वर्षांचा असून त्याने गेल्याच महिन्यात सैन्यात जाण्यासाठी परीक्षा दिली होती.