Sun, May 26, 2019 18:42होमपेज › Konkan › देऊड-चिंचवाडी बोगद्याचे काम रोखले

देऊड-चिंचवाडी बोगद्याचे काम रोखले

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 02 2018 10:46PMरत्नागिरी : प्रतिनिधी 

जयगड-डिंगणी रेल्वे प्रकल्प बाधित देऊड-चिंचवाडीतील ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने सोमवारी पुन्हा रेल्वे बोगद्याचे काम रोखले. या प्रकल्पाच्या अधिकार्‍यांनी पुन्हा आश्‍वासने देऊन तात्पुरता तोडगा काढला आहे. 

जयगड-डिंगणी रेल्वे मार्गामुळे या परिसरातील निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. नैसर्गिक जलस्रोत बंद केले जात आहेत. या बोगद्यातून बाहेर काढण्यात आलेल्या दगड-मातीने हे जलस्त्रोत बंद पडले आहेत.  मात्र, या प्रकल्प अधिकार्‍यांकडून हे स्त्रोत बंद करण्याचा आणि पर्यावरणाची नासधूस करण्याचा आपल्याला ठेकाच मिळाला आहे, असा अविर्भाव दिसून येत आहे.

देऊड-चिंचवाडीतील ग्रामस्थांना अंधारात ठेवून त्यांच्या विविध मागण्यांकडे पद्धतशीर दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, राजकीय मंडळी या ग्रामस्थांच्या मदतीला येत नाहीत, यामागे असे कोणते कारण दडले आहे, याबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहे.

देऊड-चिंचवाडीतील ग्रामस्थांनी सोमवारी बोगद्याचे काम रोखले. त्यानंतर जयगड-डिंगणी रेल्वे प्रकल्प अधिकारी व पोलिस हे घटनास्थळी आले. यावेळी प्रकल्प अधिकार्‍यांनी तीन वर्षांसाठी पाणी योजना व रस्ता करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, काम संपल्यानंतर त्यांनी पाण्याच्या व्यवस्थेची जबाबदारी झटकली आहे. अन्य नुकसानभरपाईची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असल्याचे सांगितलेे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करा, असेही या ग्रामस्थांना सांगितले आहे.रात्री उशिरापर्यंत सुरूंग लावले जातात, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सुरूंगांमुळे येथील घरांना तडे गेले आहेत.