Fri, Apr 26, 2019 03:22



होमपेज › Konkan › वारकरी सांप्रदायाचे कार्य म्हणजे धर्मसेवा

वारकरी सांप्रदायाचे कार्य म्हणजे धर्मसेवा

Published On: Dec 18 2017 2:35AM | Last Updated: Dec 17 2017 8:35PM

बुकमार्क करा





वैभववाडी : वार्ताहर

ज्यावेळी आपण धर्माचे रक्षण करू, तेव्हा आपले रक्षण भगवंत करेल. कारण सकल सजीव सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेत असतो. वारकरी सांप्रदायाचे कार्य हे धर्म कार्य आहे. ते अविरतपणे चालू ठेवले पाहिजे. वारकरी सांप्रदाय जिल्ह्यात बहरला पाहिज, असे प्रतिपादन वारकरी सांप्रदायचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.विश्‍वनाथ गवंडळकर यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय आयोजित वारकरी मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा एडगाव येथील सुमित्रा मंगल कार्यालयात पार झाला.  वैभववाडी सभापती लक्ष्मण रावराणे, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर,अ‍ॅड. हर्षद गावडे, जयेंद्र रावराणे, उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, नंदू शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके, तालुका संघटक अशोक रावराणे, मधुकर प्रभुगावकर, वारकरी सांप्रदायचे तालुकाध्यक्ष दत्ताराम साटम, शिक्षक नेते शरद नारकर, मनोहर फोडके आदी जिल्ह्यातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह.भ.प.गवंडळकर म्हणाले, वारकरी सांप्रदायमध्ये तरुणांची संख्या अत्यल्प आहे. या तरुण वर्गाला आपल्याकडे वळविले पाहिजे.यासाठी आई-वडिलांनी त्यांना या मार्गात आणले पाहिजे.  धर्म रक्षणाची सुरुवात स्वतःच्या घरापासून सुरुवात केली पाहीजे. जसे घरात आपण देवाचे नामस्मरण करतो तसेच प्रत्येक वाडीत, गावात, तालुक्यात व जिल्ह्यात केले पाहिजे. यात तरूणांचा सहभाग वाढला पाहिजे. 
शिवसेना संपर्क प्रमुख दुधवडकर म्हणाले,याची देह याची डोळा  या उक्तीप्रमाणे प्रत्येक माणसाने अहंकारीपणा काढून टाकला पाहिजे. तुमच्या पुण्य कार्यामुळेच जिल्हा चालणार आहे. आज मला प्रत्यक्षात पांडुरंगाचे दर्शन झाले असल्याचे भावाद्गार त्यांनी काढले. कीर्तनकारांनी प्रत्येक गावात कीर्तने केली पाहिजे. संतांच्या संस्कारामुळेच आम्ही येथे आलो आहोत. असे उद्गार सभापती लक्ष्मण रावराणे यांनी काढले.
 वारकरी मेळाव्यानिमित्त एडगाव येथे भव्य मैदानात डोळ्याचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा पार पडला. तत्पुर्वी वैभववाडी दत्त मंदिर ते एडगाव अशी   अभंगाचा तालावर व हरिनामाचा जयजयकार करीत वारकरी दिंडी काढ्ण्यात आली.  यावेळी संतसेवा पुरस्कार कणकवली येथील गोपाळ सावंत(65) यांना शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.