Fri, Jul 19, 2019 19:57होमपेज › Konkan › रोणापाल ग्रामस्थांनी रोखले तिलारी कालव्याचे काम

रोणापाल ग्रामस्थांनी रोखले तिलारी कालव्याचे काम

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 11 2018 10:30PMमडुरा : वार्ताहर

स्थानिकांच्या मागण्यांबाबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी चालढकल करत असल्याचा आरोप करते रोणापाल ग्रामस्थांनी बुधवारी तिलारी शाखा कालव्याचे काम बंद पाडले. पारंपरिक पायवाटा, साकव उभारण्याच्या मागण्यांकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. तिलारी कालवा विभागाचे  सहाय्यक अभियंता दिलीप निपाणी यांच्यावर ग्रामस्थांनी प्रश्‍नांची सरबत्ती केली. ठोस आश्वासन मिळेपर्यंत काम सुरू करू देणार नाही असा इशारा सरपंच सुरेश गावडे यांनी दिला. अखेर शनिवारी दुपारपर्यंत मागण्यांच्या पुर्ततेबाबत लेखी आश्वासन देण्याचे आश्वासन निपाणी यांनी दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.

तिलारी कालवा प्रकल्पांतर्गत बांदा शाखा कालव्याचे काम रोणापाल गावात प्रगतीपथावर आहे. सन 2014 मध्ये संबंधित विभागाने त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविली होती. त्यावेळी अधिकार्‍यांसमवेत झालेल्या चर्चेत ग्रामस्थांनी पायवाटांच्या ठिकाणी साकव उभारण्याची मागणी केली होती. तत्कालिन अधिकार्‍यानी सर्व मागण्या मान्य केल्याने ग्रामस्थांनी जमिनीचा मोबदला मिळण्याच्या अगोदरच काम करण्याला हिरवा कंदिल दिला होता. गेली तीन वर्षे स्थानिक आपल्या मागण्यांबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करत होते. मात्र, ग्रामस्थांच्या मागण्यांची पुर्तता करण्याकडे संबंधित विभागाने कानाडोळा करत काम सुरू ठेवले होते.

अखेर मंगळवारी सायंकाळी सरपंच सुरेश गावडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी कालव्याचे काम बंद पाडले. त्यानंतर उशिरा सहाय्यक अभियंता दिलीप निपाणी,  संतोष कविटकर, कनिष्ठ अभियंता अजित पाटील घटनास्थळी दाखल झाले.  ग्रामस्थांच्या पत्राला उत्तर देण्यास आपण बांधिल नसल्याचे  श्री. उत्तर निपाणी यांनी देताच परिस्थिती आणखीनच चिघळली. आपला विभाग केवळ तोंडी आश्‍वासने देतो. पूर्तता करण्यासाठी काहीच कार्यवाही करत नसल्याचा आरोप माजी सरपंच उदय देऊलकर, दाजी केणी यांनी केला. त्यावर संबंधित विभागाचे अधिकारी निरूत्तर झाले.

आपल्या तोंडी आश्वासनांवर आमचा काडीमात्र विश्वास नाही. यापुढे मागण्यांना हरताळ फासण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही गप्प बसणार नाही. कालव्याचे एकही काम होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. अखेर अभियंता निपाणी आक्रमक ग्रामस्थांसमोर नरमले. येत्या शनिवार दुपारपर्यंत मागण्यांच्या पुर्ततेबाबतचे लेखी पत्र देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसे न झाल्यास आपण स्वत: कालव्याचे काम बंद करण्याचे आदेश देण्याचे अभिवचनही त्यांनी दिले. आश्वासनांची पूर्तता न झाल्यास वेगळ्या मार्गाने लढा देण्याचा इशारा यावेळी सुरेश गावडे यांनी दिला. सरपंच सुरेश गावडे, उपसरपंच भिकाजी(पप्या) केणी, माजी सरपंच उदय देऊलकर, विष्णू सावंत, मडुरा सोसायटीचे संचालक यशवंत कुबल, आपा गावडे, सुदिन गावडे, उमेश कोळापटे, यशवंत माधव आदींसह मोठ्या संख्येने प्रकल्पबाधित शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags : Konkan, work, Tilari, canal, stopped, villagers, village, Rental