Sun, Jul 21, 2019 14:45
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › दुसर्‍या लग्‍नाची वरात, पोलिस स्टेशनच्या दारात!

दुसर्‍या लग्‍नाची वरात, पोलिस स्टेशनच्या दारात!

Published On: Apr 29 2018 11:53PM | Last Updated: Apr 29 2018 10:53PMकणकवली : वार्ताहर

माहेरवरून  एक वर्षाच्या मुलासह आठ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या त्या विवाहितेने  दुसरे लग्न केले खरे, मात्र याची माहिती मिळाल्यानंतर तिच्या माहेरची मंडळींसह पहिला पती कणकवली पोलिसात पोहोचला. माहेरच्या मंडळींनी तिला दुसर्‍या लग्नाविषयी जाब विचारला असता ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. अखेर माहेरच्या मंडळी व पहिला पती पोलिस स्टेशनवरून निघून गेले आणि ती विवाहिता मुलाला सोबत घेऊन दुसर्‍या नवर्‍याच्या घरी रवाना झाली. “दुसर्‍या लग्नाची वरात, पोहोचली पोलिस स्टेशनच्या दारात” असेच काहीसे चित्र रविवारी सायंकाळी कणकवली पोलिस स्टेशनवर पाहायला मिळाले. 

वैभववाडी तालुक्यातील एका युवतीचा दोन वर्षांपूर्वी कणकवली तालुक्यातील एका युवकाशी विवाह झाला होता. मात्र, या विवाहास युवकाच्या घरच्यांनी मान्यता न दिल्याने ती गेली दोन वर्षे मती  राहत होती. या दरम्यान त्यांना एक मुलगाही झाला. नवरा मुंबईत हॉटेलमध्ये नोकरीला तर ती माहेरी असा संसार सुरू होता. 

आठवडाभरापूर्वी ती मुलाला सोबत घेऊन माहेरून बेपत्ता झाली. माहेरच्या मंडळींनी त्याची तक्रार पोलिसात दिली होती. शोधाशोध सुरू असताना रविवारी ती कणकवलीत आढळून आली. चौकशी केली असता कणकवलीतील एका कॉलेज मैत्रिणीच्या ओळखीतील युवकाशी तिने दुसरे लग्न केल्याचे समजले. त्याचेही पहिले लग्न झालेले होते. मात्र, पत्नीने त्याला सोडचिठ्ठी देत दुसर्‍याशीच संसार थाटला होता. त्यामुळे चार दिवसांपूर्वी हे दोघे विवाहबध्द झाले. याची माहिती मिळाल्यानंतर माहेरची मंडळी व पहिल्या पतीने पोलिसांत धाव घेतली. 

पोलिसांनी नवीन जोडप्याला शोधून आणले. त्यांच्यासोबत इतर मंडळीही पोलिसांत पोहोचले. त्यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत होते. दुसरे लग्न करताना तीने पहिला नवरा त्रास देतो, नांदवत नाही असे सांगितले होते. मात्र, माहेरच्या मंडळींकडून मिळालेल्या माहितीनंतर ती खोटे बोलत असल्याचे उघड झाले. 

अखेर पोलिसांनी तिचे मत विचारले असता आपल्याला दुसर्‍या नवर्‍यासोबत संसार करावयाचा आहे, असे तिने सांगितले. मात्र, या प्रकारामुळे पोलिस स्टेशनवर तासभर हा लग्नाचा घोळ सुरू होता.