Tue, Feb 19, 2019 23:05होमपेज › Konkan › देवगड किनारपट्टीवर महाकाय लाटा

देवगड किनारपट्टीवर महाकाय लाटा

Published On: Apr 22 2018 11:21PM | Last Updated: Apr 22 2018 11:00PMदेवगड : प्रतिनिधी

उपरच्या वार्‍यानंतर दक्षिण वार्‍याचा जोर वाढल्याने समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाली असून किनारपट्टीला महाकाय उंच लाटा धडकत असल्यामुळे भरतीच्यावेळी पाण्याची पातळी वाढली होती. समुद्रात घाळाघाळ निर्माण झाल्यामुळे मच्छिमारी व्यवसाय बंद ठेवण्यात आला.

गेले दोन दिवस उपरच्या वार्‍याचा जोर होता मात्र रविवारी सकाळपासून दक्षिण वार्‍याचा जोर वाढल्याने समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाली असून किनारपट्टी भागातही उंच लाटा धडकत असल्याने मच्छिमारांनी तात्काळ किनार्‍यावर काढलेल्या होड्या व जाळी सुरक्षितस्थळी हलविली.

देवगड तालुक्यातील देवगड बीच समुद्रकिनारा, तांबळडेग, मिठमुंबरी, कुणकेश्‍वर, गिर्ये, पडवणे, मुणगे आदी समुद्रकिनारी महाकाय लाटा धडकत होत्या. यामुळे समुद्रकिनारी भागात भरतीच्या वेळी पाण्याची पातळी वाढली होती. वादळसदृश वातावरणामुळे समुद्रात घाळाघाळ निर्माण झाली असल्याने देवगड बंदरातील नौका समुद्रात मच्छिमारीसाठी गेल्या नाहीत.गेलेल्या काही नौकाही बंदरात परतल्या असून सध्या देवगड बंदरातील मच्छिमारी व्यवसाय बंद आहे. वादळसदृश वातावरण निवळले तरी समुद्रातील घाळाघाळ आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता मच्छिमार नेते भाई खोबरेकर यांनी व्यक्‍त केली.
 

Tags : Devgad coastline, waves