Tue, Aug 20, 2019 04:08होमपेज › Konkan › आघाडीचा विजय हा धर्मनिरपेक्ष विचारांचा : आ. सुनील तटकरे

आघाडीचा विजय हा धर्मनिरपेक्ष विचारांचा : आ. सुनील तटकरे

Published On: Jun 12 2018 12:52AM | Last Updated: Jun 11 2018 11:05PMचिपळूण : शहर वार्ताहर

देशात व राज्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांच्या माध्यमातून तसेच शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मिळालेला विजय हा धर्मनिरपेक्ष विचारांचा विजय आहे. ही विचारांची बैठक अधिक भक्‍कम करण्यासाठी व कोकणात पुन्हा एकदा पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून आघाडीच्या उमेदवारास विजयी करून हॅट्ट्रिक साधण्याची संधी आली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस व आ. सुनील तटकरे यांनी केले. 

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चिपळुणात सोमवारी (दि. 11) माटे सभागृहात आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, चिपळूण तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, महिला  आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, नजीब मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आ. तटकरे पुढे म्हणाले की, आघाडीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. विजयाची हॅट्ट्रिक कोकणात व्हावी. धर्मनिरपेक्ष विचारांची बैठक भक्‍कम होण्यासाठी हा विजय महत्त्वाचा आहे. ‘अच्छे दिन’ सोडाच, पण पूर्वीचेच दिवस परत मिळावेत, अशी भावना आता सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. 

विजयासाठी आकडेमोडीचे राजकारण केले जाते. यावेळी मात्र ते चुकले आहे. या निवडणुकीत ज्यांनी गद्दारी केली त्यांच्याविषयी कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे, असे डावखरे यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली. कार्यकर्त्यांनी गाफील राहून चालणार नाही. प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचून आपल्या उमेदवाराची ओळख त्यांच्या मनात ठसवा. विकासकामांची जाण असलेला आपला उमेदवार आहे. तसेच सर्वसामान्यांच्या खांद्याला खांदा लावून करणार्‍या उमेदवाराच्या विजयासाठी आघाडीतील सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

विधान परिषद निवडणुकीत केवळ दोनशे मते जवळ असतानाही आपण अधिक चारशे मतांची मजल मारली. हे राजकीय गणित शिवसेना व भाजपला कळलेच नाही. खा. अनंत गीते यांचा परतीचा प्रवास आता सुरू झाला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही मी केवळ दोन हजार मतांनी पराभूत झालो. पराभूत झाल्याचे दु:ख नाही. मात्र, मोदी लाटेतही निकराचा लढा दिला. नजीब मुल्ला हा कर्तबगार कार्यकर्ता आहे. ठाणे ‘मनपा’त त्याने उत्तम काम केले आहे. कोकण मर्कन्टाईल बँक अध्यक्ष म्हणूनही त्याचे काम चांगले आहे. अशा तरूणाला काम करण्याची संधी द्या.

या वेळी नजीब मुल्ला म्हणाले की, शिक्षकांवर अन्याय होत आहे. शाळाबाह्य कामे शिक्षकांवर लादली जात असल्याने शैक्षणिक दर्जा घसरत आहे. ही कामे लादली जाऊ नयेत. या बरोबरच पदवीधरांचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यास आपण कटिबद्ध राहू.