Sat, Jul 20, 2019 09:23होमपेज › Konkan › वार्‍यासह लाटेच्या धडकेने नौका उलटली

वार्‍यासह लाटेच्या धडकेने नौका उलटली

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 02 2018 9:32PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

तालुक्यातील पूर्णगड-कशेळी समुद्रात मच्छीमार नौका बुडाली. मासेमारी करीत असताना समुद्रात सोडलेली जाळी नौकेच्या पंख्यात गुरफटली. त्यामुळे नौकेचे इंजिन बंद पडले. त्याचवेळी वारा आणि लाटेच्या धडकेने नौका उलटली. नौकेतील पाचही खलाशी बचावले असून ते पोहत किनार्‍यावर आले. रविवारी सकाळी 6.30 वा.च्या सुमारास ही घटना घडली.

पूर्णगडातील सादिक इसार दर्वेश यांच्या मालकीची सैफान नावाची यांत्रिकी नौका रात्री 2 वा.च्या सुमारास पूर्णगड जेटीवरून मासेमारीसाठी समुद्रात गेली. पूर्णगड-कशेळीदरम्यान जाळी समुद्रात सोडून मासेमारी होत असतानाच ही जाळी नौकेच्या पंख्यामध्ये गुरफटली. त्यामुळे नौकेचे इंजिन बंद पडले. लाटांवर हेलकावे घेणारी ही नौका एका मोठ्या लाटेसह वार्‍याच्या मार्‍याने समुद्रातील एका खडकाजवळ उलटली. 

प्रसंगावधान राखत या दुर्घटनाग्रस्त नौकेतील पाच खलाशांनी पोहत सुखरूप किनारा गाठला. मात्र, नौकेचे सुमारे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंदाराव साळुंखे, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आनंद पालव, सुरक्षा पर्यवेक्षक तुषार करगुटकर आदींसह इतर सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी भेट दिली.