Sun, Jul 21, 2019 00:12होमपेज › Konkan › झाराप येथील विद्यापीठ उपकेंद्र कामाला गती मिळणार : सुहास पेडणेकर

झाराप येथील विद्यापीठ उपकेंद्र कामाला गती मिळणार : सुहास पेडणेकर

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 8:37PMकुडाळ : शहर वार्ताहर 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप येथे प्रस्तावित मुंबई विद्यापीठ उपकेंद्र कामाला गती मिळणार आहे. या उपकेंद्रात विद्यापीठाचे विविध कोर्सेस उपलब्ध करून कोकणातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाणार आहे. या उपकेंद्रामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोकणाबाहेर जावे लागणार नाही, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू तथा सिंधुदुर्गचे सुपूत्र डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले.

झाराप येथील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेची पाहणी रविवारी कुलगुरू डॉ. पेडणेकर यांनी खा. विनायक राऊत यांच्यासमवेत केली. जि.प. सदस्य संजय  पडते, नागेंद्र परब, राजू कविटकर, माजी उपसभापती बबन बोभाटे, झाराप सरपंच सौ. स्वाती तेंडोलकर, हुमरस सरपंच अनुप नाईक, कॅप्टन प्रभू आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

डॉ. पेडणेकर यांनी जागेची पाहणी करताना जवळचे झाराप रेल्वेस्टेशन, वेंगुर्ले बंदर, माणगांवचे  दत्तमंदिर, कुडाळ रेल्वेस्टेशन, मुंबई-गोवा हायवे, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले शहर आदी अंतराची माहिती घेतली. कोकणातील  विद्यार्थ्याला   कोकणातच  दर्जेदार  शिक्षण व नोकर्‍याही मिळाव्यात या दृष्टीने या उपकेंद्रात विविध कोर्सेस  सुरू केले जातील, असे डॉ. पेडणेकर यांनी  सांगितले. खा. राऊत यांनी या केंद्राच्या  माध्यमातून कोकणी माणसाला प्लॅटफॉर्म निर्माण होण्यासाठी आपले सहकार्य मिळेल, असे सांगितले. 

खा.  राऊतांनी केली महामार्ग चौपदरीकरणाची पाहणी

खा. विनायक राऊत यांनी साळगाव तेर्सेबांबर्डे दरम्यान मुंबई-गोवा चौपदरीकरण कामाची पाहणी केली. पावसामुळे रस्त्यावर झालेला चिखल, साचलेले पाणी  तात्काळ हटवण्याच्या सूचना दिलीप बिल्डकॉन कंपनी प्रशासनाला केल्या. तसेच पावसाळ्यातही आवश्यक सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.