Sun, Aug 25, 2019 03:39होमपेज › Konkan › देऊड-चिंचवाडीवासीयांचे कामबंद आंदोलन मागे

देऊड-चिंचवाडीवासीयांचे कामबंद आंदोलन मागे

Published On: May 29 2018 1:37AM | Last Updated: May 28 2018 10:32PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जयगड-डिंगणी रेल्वे मार्गाचे काम करताना मागण्यांकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे संतप्त भावनेतून देऊड-चिंचवाडी ग्रामस्थांनी दोन दिवस रोखलेले काम सुरू करण्यासंदर्भात पोलिसांनी केलेली शिष्टाई सफल झाली आहे. मागण्यांसंदर्भात जयगड-डिंगणी रेल्वे प्रकल्प अधिकार्‍यांसोबत तोडग्यासाठी बैठक घेण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

जयगड-डिंगणी हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प खासगी विकासकांकडून साकारण्यात येत आहे. मात्र, हा साकारत असताना स्थानिकांवर अन्याय होत असल्याने या मार्गावरील जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे. या मार्गावर सर्वच ठिकाणी मनमानी सुरू असल्याचे चित्र आहे. प्रकल्प अधिकार्‍यांकडून स्थानिकांची दिशाभूल होत आहे. यामुळे 
स्थानिकांमध्ये विरोधाची धगधग अद्याप सुरू आहे.

देऊड-चिंचवाडी ग्रामस्थांच्या वस्तीखालून रेल्वेचा बोगदा जात आहे. या बोगद्यासाठी जास्त क्षमतेचे सुरूंग लावले जात असल्याने वस्तीतील घरांना तडे जात आहेत. या संदर्भात प्रकल्प अधिकारी यांनी घरांना प्‍लास्टर करून देतो, असे सांगितले. मात्र, केवळ तडेच भरून दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

या ग्रामस्थांनी नेमका रेल्वे मार्ग कसा जातो, याची माहिती मागितली आहे. मात्र, ती देण्यासही टाळाटाळ केली जात आहे. रेल्वे बोगद्यामुळे वस्तीतील सर्व विहिरींचे झरे आटले आहेत. त्यामुळे वाडीमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. यावर तोडगा म्हणून प्रकल्प विकासकांनी त्यांना पाण्याची सोय करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. मात्र, कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्याने त्याबाबतही ठोस निर्णय व्हावा, अशी मागणीही ग्रामस्थांची आहे.

चिंचवाडीवासियांची वहिवाट असलेली जागा या रेल्वे मार्गात गेली आहे. मात्र, प्रकल्प अधिकार्‍यांनी मूळ मालकाच्या सोबत व्यवहार करून वहिवाटदारांचा कोणताच विचार केलेला नाही. यामध्ये या ग्रामस्थांनी अनेक स्वत: लावलेली झाडे आहेत. त्याची नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. महसूल खात्याने सर्वच बाबतीत ‘हाताची घडी तोंडावर बोट’ अशी भूमिका घेतल्याने येथील ग्रामस्थही न्यायासाठी चिंतेत आहेत. 

यासह अनेक मागण्यांची पूर्तता होत नसल्याने संतप्त झालेल्या चिंचवाडीवासियांनी शनिवारी रेल्वेचे काम रोखले. गेले दोन दिवस काम बंद असल्याने प्रकल्पाचे काही अधिकारी सोमवारी पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. तब्बल तीन तासांच्या चर्चेनंतर पोलिसांची शिष्टाई सफल झाली. यावेळी प्रकल्प विकासकांच्या अधिकार्‍यांनी 7 जून रोजी जबाबदार अधिकार्‍यांसोबत ग्रामस्थांची तोडग्यासाठी बैठक घेणार असल्याचे आश्‍वासन ग्रामस्थांना दिले आहे. यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन तोडगा निघेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.