Sun, Jul 21, 2019 14:56
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › दारू वाहतूक करणार्‍या कारचा थरारक पाठलाग

दारू वाहतूक करणार्‍या कारचा थरारक पाठलाग

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 12 2018 10:59PM

बुकमार्क करा
बांदा : वार्ताहर

सातार्डा-मळेवाड रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाला हुलकावणी देत अवैध दारूची वाहतूक करणार्‍या कारचा थरारक पाठलाग करीत पकडण्यात यश मिळविले. मात्र, काळोखाचा फायदा घेत कारचालकाने पलायन केले. उत्पादन शुल्क विभागाने या कारमधून 2 लाख 30 हजार 400 रुपयांच्या दारूसह एकूण 7 लाख 55 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर कारमध्ये असलेल्या सर्व्हिस बुकवरून मेलविन फर्नांडिस (रा.देवसू,कोरगाव-पेडणे-गोवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सातार्डा-मळेवाड रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग कुडाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार, दारूची चोरटी वाहतूक  रोखण्यासाठी रात्री 2 वा. सापळा रचला होता. रात्री 2.45 वा.च्या सुमारास सातार्डा येथून सावंतवाडीच्या दिशेने येणारी एस सिल्व्हर स्विफ्ट कारला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने कार न थांबवता पथकाला हुलकावणी देत कार तशीच रस्त्यावरून पुढे नेली.त्यामुळे उत्पादन शुल्क विभागानेही त्या कारचा पाठलाग सुरू केला. 

दरम्यान, आपला पाठलाग होत आहे हे लक्षात येताच कारचालक कच्चा रस्त्यावर जंगल भागात कार टाकून अंधाराचा फायदा घेत पळून गेला. या कारची तपासणी केली असता आतमध्ये नॅशनल डॉक्टर ब्रँडच्या कंपनीची 2 लाख 30 हजार 400 रुपये किंमतीचे 60 बॉक्स आढळून आले. उत्पादन शुल्क विभागाने ही दारू व 5 लाख 25 हजार रुपये किंमतीची स्विफ्ट कार असा एकूण 7 लाख 55 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गाडीत असलेल्या सर्व्हिस बुकमधील नोंदीवरून मेलविन फर्नांडिस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध बनावट दारूविक्री व वाहतुकीस पायबंद घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्‍त अश्‍विनी जोशी व विभागीय उपआयुक्‍त संगीता दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे अधीक्षक अतुल रानडे यांनी सातत्यपूर्ण कठोर कारवाया सुरू केल्या आहेत. ही कारवाई कुडाळ पथकाचे प्रभारी निरीक्षक अमित पाडाळकर,उपनिरीक्षक संजय साळवे,उपनिरीक्षक शंकर जाधव, जवान प्रसाद माळी, हेमंत वस्त,श्री.मुपडे,अवधूत सावंत,प्रशांत परब व विजय राऊळ यांनी केली.अधिक तपास उपनिरीक्षक संजय साळवे करीत आहेत.