Fri, Apr 26, 2019 19:17होमपेज › Konkan › जिल्ह्यात काँग्रेसचा अस्तित्वासाठी संघर्ष

जिल्ह्यात काँग्रेसचा अस्तित्वासाठी संघर्ष

Published On: Apr 08 2018 2:12AM | Last Updated: Apr 08 2018 12:43AMचिपळूण : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचा अस्तित्त्वासाठी संघर्ष सुरू असल्याची चर्चा आता पक्षातच रंगू लागली आहे. एकेकाळी जिल्ह्यात ताकदवान पक्ष म्हणून काँग्रेसला ओळखले जायचे. मात्र सध्या अस्तित्त्वासाठी सुरू असलेल्या संघर्षाला प्रदेश नेतृत्वच जबाबदार असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

गेली अनेक वर्षे जिल्हा काँग्रेस नेतृत्वहीन बनली असून प्रदेश स्तरावरूनही रत्नागिरी जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा संताप काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. 
जिल्ह्यातील नऊही तालुक्यांमध्ये काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली आहे. या सर्वच तालुक्यांमध्ये एकेकाळी काँग्रेस पक्षाला वैभवाचे दिवस लाभले होते. कार्यकर्त्यांची मोठी फळी पक्षाकडे असायची. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याकडे संघटनात्मक ताकद पुरवलीच गेली नाही. जिल्हाध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. विजय भोसले, अशोक जाधव, सुधीर दाभोळकर, सदानंद गांगण यासारखी सक्षम मंडळी असतानाही त्यांना नेतृत्व दिले जात नाही. 

जिल्ह्यामध्ये प्रशासनाची माहिती, उत्तम वक्तृत्व, जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय जाण व काँग्रेसच्या विचारांची बांधिलकी मांडणारे पदाधिकारी असतानाही त्यांना संधी दिली जात नाही. यामागे काहींचे हितसंबंध असल्याचा आरोप आता कार्यकर्ते करीत आहेत.

जिल्ह्याचे प्रभारी विश्‍वनाथ पाटील यांनी नेमणूक झाल्यानंतर उत्साह वाढवला होता. परंतु त्यांच्या सूचनांना प्रदेश स्तरावर काही किंमत नसल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. आपापले हितसंबंध टिकविण्यासाठी जिल्ह्यात काँग्रेसला अस्तित्त्वहीन ठेवायची रणनीती आखली जात आहे, असा आरोप कार्यकर्ते करीत आहेत. यातील अनेकजण प्रदेशस्तरावर आपणच कसे उत्तम संघटन बांधत आहोत अथवा आपण नुकताच कसा जिल्हा दौरा करून आलो याचा दिशाभूल करणारा अहवाल प्रदेश पातळीवर सादर करीत आहेत. 

दुर्दैवाने प्रदेश पातळीवरील नेतृत्व प्रत्यक्ष माहिती न घेता अशाच अहवालावर विसंबून राहत असल्याने जिल्हा काँग्रेसची अवस्था गलितगात्र बनली आहे. याबाबत आता सोशल मीडियावरही जिल्हा काँग्रेसच्या स्थितीबाबत उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. 

एकेकाळी वैभवाचे दिवस मिरवणार्‍या काँग्रेस पक्षाला अशा पद्धतीने अस्तित्त्वहीन व्हावे लागत असल्यामुळे कार्यकर्ते निराश आहेत.  प्रदेश पातळीवरील नेतृत्वाने या जिल्ह्याचे राजकीय महत्त्व ओळखावे अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.

जिल्हाध्यक्ष नसल्याने पक्ष एकाकी
नुकत्याच होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत जिल्हाध्यक्षांशिवाय काँग्रेस पक्ष एकाकी लढत आहे. पक्षाला अध्यक्षच नसल्याने प्रशासकीय निमंत्रणेसुद्धा न मिळण्याइतकी स्थिती घसरली आहे. ही प्रतिमा बदलण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे.
 

Tags :  ratnagiri district, Congresss