Thu, Jul 18, 2019 12:54होमपेज › Konkan › सिंधुदुर्गातही शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष वाढला!

सिंधुदुर्गातही शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष वाढला!

Published On: May 29 2018 1:37AM | Last Updated: May 28 2018 10:01PMराजकीय विशेष : गणेश जेठे

तिकडे लोकसभेच्या पालघर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या कथित ऑडिओ क्‍लीपवरून शिवसेना-भाजपमध्ये वाक्युद्ध सुरू असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातही शिवसेना व भाजप या पक्षांमध्ये संघर्ष वाढला आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शिवसेनेच्या पराभवानंतर हा संघर्ष वाढत चालला असून भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आ. प्रमोद जठार आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक हे राजकीय मित्र आता मात्र एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या असल्याने हा संघर्ष वाढणार की तो मिटवला जाणार हे काळच ठरवणार आहे.

विधानपरिषदेमधील शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. राजीव साबळे यांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. भाजपनेच आपली मते शिवसेनेच्या विरोधात टाकून शिवसेनेवर राग व्यक्‍त केला, त्यामुळे संधी मिळेल तेव्हा भाजपला कोंडीत पकडून बदला घ्यायचा असे शिवसेनेच्या गोटात ठरविल्याची चर्चा आहे.

गेली साडेतीन वर्षे महाराष्ट्रात आणि केंद्रातही सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना-भाजपमध्ये राज्यस्तरावर जाहीररीत्या वाद सुरू आहेत. मित्रपक्ष असूनही हे दोन्ही पक्ष शत्रूसारखे वागत आहेत. पालघर पोटनिवडणुकीत तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष पराकोटीला पोहोचला आहे. राज्यात शिवसेना-भाजपमध्ये कितीही संघर्ष झाला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र अपवाद वगळता शिवसेना व भाजपच्या नेत्यांमध्ये सलोख्याचे संबंध कायम राहिले होते. म्हणूनच कोकण पदवीधर मतदारसंघात रायगड, रत्नागिरीत जरी भाजपने शिवसेनेला विरोधी करण्याची भूमिका घेतली तरी सिंधुदुर्गातील भाजपची मते सेनेचे उमेदवार राजीव साबळे यांनाच पडतील, असा एक दावा केला जात होता. पण तसे घडले नाही.

पालघरमधील वादानंतर भाजपश्रेष्ठींनी शिवसेनेविरोधात उतरण्याचे आदेश आले असतील तर भाजपची स्थानिक नेतेमंडळी तरी काय करणार...? कदाचित त्यामुळेच सिंधुदुर्गातील भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेशी पंगा घेतला असावा. आ. वैभव नाईक यांनी मालवणात पत्रकारांशी बोलताना भाजपवर टीका केली. विधानपरिषद निवडणुकीत भाजपने स्वार्थी राजकारण केले असा आरोप आ. वैभव नाईक यांनी केला.

राजकीय गरज म्हणून जेव्हा प्रमोद जठार यांनी आ. नाईक यांना प्रत्युत्तर दिले तेव्हा त्यांनी ‘आमची युती झालीच नव्हती’ असा युक्‍तिवाद केला. ते इथवर थांबले नाहीत, त्यांनी एप्रिल महिन्यात झालेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील ‘स्ट्रॅटेजी’ला हात घातला. आ. वैभव नाइक यांनी कणकवली प्रभाग 10 मध्ये स्वाभिमान पक्षाचे समीर नलावडे यांना मदत करून भाजपचे उमेदवार संदेश पारकर यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा गंभीर आरोप जठार यांनी केला. शिवसेनेने प्रभाग 10 मधून निवडून आलेल्या नगरसेविका माही परुळेकर यांच्यामार्फत जठार यांच्यावर पलटवार केला. कणकवलीतील निवडणुकीत जठार अलिप्‍त का होते? असा सवाल करून संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रमोद जठार, आ. वैभव नाईक आणि संदेश पारकर हे तसे एकमेकांचे राजकीय मित्र. माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या रणनीतीची धग कमीत कमी बसावी यासाठी हे तीन मित्र गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या पक्षात असूनही राजकारणात वैचारिकदृष्ट्या एक आहेत. मात्र संदेश पारकर यांचा कणकवलीतील पराभव स्वतः पारकर आणि भाजपला परवडणारा नव्हता. कुठल्याही निवडणुकीतील पराभवानंतर पराभूत गोटात संशयाचे ढग दाटून येतात. तसे ते कणकवलीतही भाजप आणि शिवसेनेच्या गोटात आले. आता आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस सुरू झाला आहे. पाऊस पडून आकाश मोकळे होईल अशी शक्यता कमीच आहे. कारण राज्यात भविष्यात शिवसेना काँग्रेससोबत जावू शकते याची खूणगाठ भाजपच्या नेत्यांनी बांधली असावी. प्रमोद जठार यांनी तीच शक्यता व्यक्‍त केली आहे.

दुसरीकडे राणे यांच्या पडवेतील हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या अगोदर आपण हॉस्पिटलच्या उद्घाटनाला जाणार असे प्रमोद जठार यांचे जाहीर करणे, हॉस्पिटलच्या उद्घाटनाला व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांच्या रांगेत त्यांचे बसणे आणि अलीकडच्या त्यांच्या काही ‘स्टेटमेंटस्’ लक्षात घेता पक्षश्रेष्ठींच्या कलानुसार का असेना, विकासाच्या मुद्यावर का असेना, जठार यांची राजकीय जुळवाजुळव राणे यांच्याशी होऊ शकते असा अंदाज बांधला जात आहे.

भविष्यात निवडणुकांपूर्वी नसेल कदाचित परंतु निवडणुकांनंतर तरी राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सत्ता स्थापनेसाठी भाजपसोबत जाऊ शकतो याचाही अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच मंडळींना आला आहे. यापुढे शिवसेना आपला फार काळ मित्र राहणार नाही अशी शक्यता भाजपच्या मंडळींना वाटत असावी. याचाच अर्थ येणार्‍या निवडणुकांपर्यंत तरी शिवसेना-भाजपमधील हा कलगीतुरा असाच पहायला मिळणार आहे. केवळ हा कलगीतुराच राहणार नाही तर त्याचे रुपांतर सत्तेसाठीच्या संघर्षामध्ये होण्याची शक्यताही आहेच. 

राजकारणात कोण कोणाचा कायमस्वरुपी मित्र वा शत्रू असत नाही असा सिद्धांत इतिहासातील वारंवार होणार्‍या पुनरावृत्तीनुसार मांडला गेला आहे. जठार आणि नाईक यांच्यातील राजकीय मैत्री इतकी वर्षे राहिली ती पुढे राहील की नाही? अशी शंका येण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे. जसा काळ जाईल तसतशी यातील परिस्थिती अधिक स्पष्ट होत जाईल.

स्वाभिमान पक्षाची भूमिका ‘वेट अँड वॉच’ची

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला कणकवलीत नगराध्यक्ष निवडून आणता आला हे त्या पक्षासाठी मोठे यश आहे. पुढील विधानसभा, लोकसभा निवडणूक लढण्याचे टॉनिक स्वाभिमान पक्षाला इथे मिळाले आहे. एकेकाळी राणे यांच्या विरोधात एकत्र येऊन लढण्याचा प्रयत्न करणारे शिवसेना-भाजप आता एकमेकांच्या विरोधात मैत्री तुटेपर्यंत उतरले आहेत याची जाणीव स्वाभिमान पक्षाला निश्‍चितपणे असावी, त्यामुळेच ‘वेट अँड वॉच’ची भूमिका स्वाभिमान पक्षाच्या नेत्यांनी अवलंबली असावी, असे वाटते.