Mon, May 20, 2019 08:49होमपेज › Konkan › दरडीचा दगड पडून असुर्डेतील तरुणाचा मृत्यू

दरडीचा दगड पडून असुर्डेतील तरुणाचा मृत्यू

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 22 2018 10:32PMदेवरूख : वार्ताहर

संगमेश्‍वर तालुक्यातील असुर्डे पाताडेवाडी येथील तरुणाचा छातीवर दरडीचा दगड पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. दत्ताराम सोमा पाताडे (वय 45) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

संगमेश्‍वर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दत्ताराम पाताडे हे गावदेवी मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी मंगळवारी रात्री गेले होते. बुधवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास गावदेवी मंदिरासमोरील पर्‍याच्या किनारी पाताडे हे प्रात:विधीसाठी गेले होते. 

मात्र, बराच वेळ झाला तरी ते न आल्याने मंदिरातील ग्रामस्थांनी पर्‍याच्या दिशेने धाव घेऊन त्यांची शोधाशोध केली. यावेळी पाताडे हे पर्‍याकिनारी निपचित पडलेल्या अवस्थेत तर त्यांच्या छातीवर दगड असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. 

याची खबर त्यांचा मेहुणा शशिकांत मांडवकर यांनी संगमेश्‍वर पोलिस ठाण्यात दिली. यानुसार पोलिस निरीक्षक उदय झावरे, उपनिरीक्षक मोहन पाटील, एस. वाय. नेवरेकर, डी. एस. ओतारी व वैभव नार्वेकर यांनी पंचनामा केला. पाताडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्‍वर ग्रामीण रूग्णालयात आणला. सायंकाळी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. अधिक तपास हे. कॉ. एस. वाय. नेवरेकर करीत आहेत.