Mon, Jul 15, 2019 23:44होमपेज › Konkan › करजुवे परिसरात सक्शनद्वारे वाळू उपसा सुरूच

करजुवे परिसरात सक्शनद्वारे वाळू उपसा सुरूच

Published On: May 11 2018 1:38AM | Last Updated: May 10 2018 10:43PMरत्नागिरी : प्रतिनिधी

सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करण्यास राज्यात बंदी असतानाही करजुवे परिसरात राजरोस सक्शन पंपांद्वारे वाळू उपसा सुरूच आहे. स्थानिक पातळीपासून जिल्हा महसूल यंत्रणेच्या आशीर्वादाने हा वाळू उपसा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. हा वाळू उपसा बंद होत नसल्याने स्थानिकांकडून आंदोलनाची व्यूहरचना केली जात आहे.

करजुवे परिसरामध्ये वाळू माफियांनी आपली पकड घट्ट केली असून, स्थानिक महसूल अधिकारी त्याला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र नापसंती व्यक्‍त केली आहे. याबाबत स्थानिक महसूल यंत्रणेने प्रतिक्रिया देताना या परिसरात कोणताही सक्शन पंप सुरू नसल्याचे सांगितले आहे.

मात्र, सर्व ग्रामस्थांना सक्शन पंप सुरू असल्याचे दिसत असताना स्थानिक महसूल कर्मचार्‍यांना कसे दिसत नाहीत? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.करजुवे परिसरात वाळू उपसा करणारे पाच सक्शन पंप सुरू असून त्यातील दोन पंप स्थानिक आहेत. एक पंप सांगलीच्या व्यक्‍तीचा तर उर्वरित दोन पंप जिल्ह्यातील आहेत. यातील दोघांनी हातपाटीचा परवाना घेतला आहे. उर्वरित तिघांकडे कोणत्याच प्रकारचा परवाना नाही. असे असतानाही महसूल यंत्रणा त्यांना बिनबोभाटपणे वाळू उपसा करण्यास कसे देते? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पावसाळा जवळ आला असताना या भागातील रस्त्यांची वाताहात होत आहे. रस्त्यावर वाळू सांडल्याने दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यामध्ये रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे या भागातील जनतेला त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. या वाळू व्यावसायिकांविरोधात स्थानिक पातळीवर असंतोष पसरला असून लवकरच या वाळू माफियांविरोधात आंदोलनाची व्यूहरचना करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.