Sat, Apr 20, 2019 10:05



होमपेज › Konkan › वाळू उत्खननाचे रॅम्प, झोपड्या उद्ध्वस्त

वाळू उत्खननाचे रॅम्प, झोपड्या उद्ध्वस्त

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 22 2018 10:58PM



मालवण : प्रतिनिधी 

वाळू उपसा बंदी कालावधी असताना अनधिकृत वाळू उत्खनन होत असल्याच्या तक्रारीच्या पार्श्‍वभूमीवर तहसीलदार समीर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण महसूल प्रशासनाने कर्ली खाडीपात्रात बुधवारी धडक कारवाई मोहीम  राबवली. कारवाईदरम्यान आंबेरी किनार्‍यावर 16 अनधिकृत वाळू रॅम्प, तर वाघवणे भागात 5 अनधिकृत वाळू रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले. तर वाळू कामगार राहत असल्याच्या संशयावरून 6 अनधिकृत झोपड्याही महसूल पथकाने जमीनदोस्त केल्या.

दरम्यान, कर्ली खाडीत वाळू उत्खननास वापर होत असलेल्या तीन होड्या सापडून आल्या. तीनही  होड्या महसूल अधिकार्‍यांनी सील केल्या.  तसेच एक होडी एका किनार्‍यावरून दुसर्‍या किनार्‍यावर सुरक्षिततेसाठी नेणार्‍या होडीची तपासणी करण्यात आली. मात्र, वाळू उत्खननाबाबत कोणतेही साहित्य न मिळाल्याने अथवा होडीत वाळूही सापडून आली नाही. त्या होडी मालकांना समज देताना होडीचा वापर वाळू उत्खनना साठी होणार नाही असे सांगत सोडण्यात आले.

आठ दिवसांपूर्वी मालवण तालुक्यातील कालावल खाडीपात्रात अश्याच पद्धतीने धडक कारवाई करत 6 होड्या महसूल प्रशासनाने सील केल्या होत्या. तर अनधिकृत वाळू रॅम्प जमीनदोस्त करत अनधिकृत झोपड्याही महसूल पथकाने जमीनदोस्त केल्या होत्या. त्यानंतर अनधिकृत उत्खनन कर्ली खाडी पात्रात सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या. त्यानुसार धडक कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे.

16 रॅम्प उद्ध्वस्त  6 झोपड्या जमीनदोस्त

आंबेरी व वाघावणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उत्खनन होत असल्याच्या तक्रारी महसूल प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. तर वाळू व्यावसायिक यांच्या बैठकीत काही वाळू व्यवसायिकांनी अनधिकृत वाळू उत्खनन होत असल्याचे सांगितले. मात्र, कोणाचेही नाव जाहीरपणे स्पष्ट केले नव्हते. या पार्श्‍वभूमीवर मालवण महसुलने धडक कारवाई करत आंबेरी किनार्‍यावर 16 अनधिकृत वाळू रॅम्प तर वाघवणे भागात 5 अनधिकृत वाळू रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले. तर वाळू कामगार राहत असल्याच्या संशयावरून 6 अनधिकृत झोपड्याही महसूल पथकाने जमीनदोस्त केल्या.महसूल प्रशासनाने सकाळी सुरू केलेली कारवाई सायंकाळ पर्यंत सुरू होती. कर्ली खाडीपात्रात आंबेरी सह मालवण हद्दीतील खाडी किनारी तपासणी मोहीम राबविण्यात आली. कारवाई पथकात आचरा मंडळ अधिकारी पारकर, मसुरा मंडळ अधिकारी निपाणीकर, हंगे यांच्यासह तलाठी, कोतवाल व अन्य कर्मचारी सहभागी होते. तहसीलदार समीर घारे यांनी अनधिकृत वाळू उत्खननावर सातत्याने केलेल्या धडक कारवाईचे कौतुक होत आहे.