Tue, Apr 23, 2019 14:20होमपेज › Konkan › सिंधुदुर्गातही आता मुक्‍त विद्यापीठ पदविधारकांना मतदानाचा हक्क

सिंधुदुर्गातही आता मुक्‍त विद्यापीठ पदविधारकांना मतदानाचा हक्क

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 8:47PM

बुकमार्क करा

वेंगुर्ला : प्रतिनिधी 

कोकण पदवीधर मतदारसंघात मुक्‍त विद्यापीठातील पदविधारकांची नोंदणी करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी घेतल्याने मुक्‍त विद्यापीठ पदवीधारकांना मतदानाचा हक्‍क बजावता येणार आहे. याबाबत सिंधुदुर्गचे उपजिल्हा निवडणुक अधिकारी प्रवीण  खाडे यांनी जिल्हयातील निवडणूक विभागांना लेखी सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे पदवीधारकातून समाधान व्यक्‍त होत आहे.  

यशवतराव चव्हाण मुक्‍त विद्यापीठ नाशिक व राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था,नवी दिल्ली या विद्यापीठांची प्रमाणपत्रे ही शासन सेवेसाठी ग्राह्य धरावीत, असा शासन निर्णय आहे.तसेच यशवंतराव चव्हाण मुक्‍त विद्यापीठ, नाशिक व राष्ट्रीय मुक्‍त विद्यालय शिक्षण संस्था,नवी दिल्ली ही विद्यापीठे युजीसी अंतर्गत येतात,त्यामुळे या विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र ही पदवीधर मतदारसंघाला ग्राह्य असतानाही केवळ सिंधुदुर्गमध्ये नोंदणी होत नव्हती.

याकरिता काही जागरुक पदविधारकांनी शासन निर्णय व युजीसी यादीचे निवेदन प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी,जिल्ह्यधिकारी व वेंगुर्ला तहसीलदार यांना 27 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कौलगेकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले होते. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा निवडणुक कार्यालयाने मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे मुक्‍त विद्यापीठ पदवीधारकांची नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन मागविले होते.

परंतु याबाबत कोणताही लेखी पत्रव्यवहार न झाल्याने कोकण पदवीधर मतदार संघाचे सह मुख्य निवडणुक अधिकारी श्री.वळवी, सामान्य प्रशासन  उपायुक्‍त महेंद्र वारभुवन तसेच कोकण विभाग विभागीय आयुक्‍त जगदीश पाटील यांच्याकडे दूरध्वनीवरुन मुक्‍त विद्यापीठ पदवीधारकांची नोंदणी होत नसल्याच्या वस्तुस्थितीबाबत  सुरेश कौलगेकर यांनी माहिती दिल्यानंतर निवडणूक अधिकार्‍यांनी तातडीने आदेश काढत सिंधुदुर्गात मुक्‍त विद्यापीठधारकांची नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.