Tue, Jul 07, 2020 07:15होमपेज › Konkan › तांडव केलात तरी रिफायनरी येऊच देणार नाही

तांडव केलात तरी रिफायनरी येऊच देणार नाही

Published On: Jun 27 2019 1:34AM | Last Updated: Jun 27 2019 1:34AM
राजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील नाणार परिसरात जी रिफायनरी प्रस्तावित केली होती ती रद्द झाली असून, पुन्हा नाणार परिसरात ती रिफायनरी येऊच शकत नाही, म्हणून आमच्या दृष्टीने हा विषय आता संपलेला आहे. गुंतवणूकदारांची बाजू घेणारे  प्रमोद जठार व इतर काही त्यांचे साथीदार यांनी कितीही तांडव नृत्य केले तरी आम्ही हा प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत इकडे येऊ देणार नाही, असा इशारा कोकणशक्‍ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.

राजापुरात होणारा रिफायनरी प्रकल्प हटवला गेल्यानंतर तो पुन्हा नाणारमध्ये होणार, या वृत्ताचा अशोक वालम यांनी समाचार घेतला. 

रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध कायम आहे. जेवढा पूर्वी होता त्याहीपेक्षा जास्त असून, आम्ही ही रिफायनरी नाणार परिसरच नव्हे, तर कोकणात कुठेही होऊ देणार नाही. कारण, रिफायनरीपासून होणारे प्रदूषण, निसर्गाचा, पर्यावरणाचा, जैवविविधतेचा होणारा नाश, जागतिक तापमान वाढीला कारणीभूत असून हे सर्व आम्ही अभ्यासपूर्वक पाहिले आहे. त्यामुळे आता कोणीही कितीही फुशारक्या मारल्या तरी ही रिफायनरी कोकणात होऊ शकत नाही, त्याला दुसरे कारण म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला याआधीच जाहीररीत्या सांगितले आहे की, कोकणची राख करून गुजरातला रांगोळी घालायला देणार नाही आणि ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. हे जमीन गुंतवणूकदारांचे लाचार दलाल फक्‍त त्या गुजराती, मारवाड्यांना काही तरी दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारण, तेच जमीन गुंतवणूकदार आता दलालांच्या उरावर बसायला लागले आहेत, असा आरोप त्यांनी केला. 

रोजगाराच्या नावाखाली ही अशी घाणेरडी, प्रदूषणकारी, विनाशकारी रिफायनरी आणण्यापेक्षा सत्ता त्यांच्याच पक्षाची असल्याने मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाच्या असल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन कोकणच्या वातावरणाला साजेसे शाश्वत कोकण राहून पर्यावरणाला हानिकारक नसलेले कोकणातील उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग धंदे त्यानी आणून दाखवावेत, असे आव्हानही वालम यांनी दिले.  अनेक असे धंदे व्यवसाय आहेत की, ते कोकणात आणून त्यातून लोकांना रोजगार उपलब्ध करून देता येईल. पण  यांना रिफायनरीच्या माध्यमातून मोठी दलाली करायला मिळणार होती व रिफायनरीत कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची स्वप्ने पडू लागली होती ती थांबल्याने यांचा जीव कासावीस होऊ लागला आहे.कोकणचा विनाश करणारा रिफायनरी प्रकल्प आता पुन्हा इकडे येणार नाही आमचा विरोध संपलेला नाही तो कायम आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे असा इशारा अशोक वालम यांनी दिला आहे.