होमपेज › Konkan › रिफायनरी प्रकल्पाचा प्रश्‍न संपला : विनायक राऊत

रिफायनरी प्रकल्पाचा प्रश्‍न संपला : विनायक राऊत

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 04 2018 9:12PMराजापूर : प्रतिनिधी

नाणार प्रकल्पासाठी गतवर्षी घोषित केलेल्या   16 गावांतील संपूर्ण क्षेत्र विनाअधिसूचित करण्याचा प्रस्ताव बनवून तो  ‘एमआयडीसी’ अ‍ॅक्टनुसार शासनाला सादर करण्याचे आदेश राज्याचे उद्योगमंत्री  सुभाष देसाई यांनी उद्योग  खात्याला दिले आहेत. त्यानंतर  हा विषय कॅबिनेटमध्ये घेऊन त्यावर तात्काळ निर्णय व्हावा म्हणून  शिवसेनेचे सर्व मंत्री दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी ओणी येथे आयोजित पत्रकार परीषदेत दिली. रिफायनरी प्रकल्पाचा प्रश्‍न आता संपला असून  शिवसेना बोलते तशी कृती करते, विरोधक मात्र फक्‍त बोलतात, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांची खिल्ली उडविली.

रिफायनरी प्रकल्पावरुन वादळ उठले आहे. गतवर्षी दि. 18 मे 2017 ला राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या स्वाक्षरीने नाणार प्रकल्पासाठी लागणार्‍या 16 गावांतील भूसंपादनाची अधिसूचना जाहीर झाली होती. त्यावरुन विरोधकांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. त्या पार्श्‍वभूमीवर 23 एप्रिलला सागवे येथील शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ती अधिसूचना मागे घेत असल्याची घोषणा केली होती. त्या दिलेल्या वचनानुसार उद्योगमंत्र्यांनी आपले काम चोख बजावल्याची माहिती खासदार राऊत यांनी पत्रकारांना दिली.

नाणार प्रकल्पासाठी अधिग्रहण केलेल्या 16 गावांतील संपूर्ण क्षेत्र विनाअधिसूचित करण्याचा प्रस्ताव करुन तो शासनाला सादर केला जाणार आहे. तसे आदेशच ना. देसाई यांनी दिले आहेत. मात्र, तो प्रस्ताव राज्याच्या कॅबिनेटसमोर मंजुरीसाठी यावा लागेल. त्यासाठी शिवसेनेचे सर्व मंत्री दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. शिवसेना नाणार प्रकल्पाविरोधात कायम राहिली आहे. आम्ही जनतेचे सदैव हित पाहिले आहे. त्यामुळे नाणार प्रकल्प हा रद्द होणार हे नक्‍की असून तो विषय आता संपला आहे. मात्र, ज्यांचा काहीही संबंध नव्हता त्यांना नाणारचा पुळका आला असून ते शिवसेनेवर नाहक टीका करीत असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला. 

यापूर्वी जैतापूरवासियांच्या माथी सर्वाधिक विनाशकारी प्रकल्प मारणार्‍या काँग्रेस - राष्ट्रवादीसह स्वाभिमान पक्षाने प्रथम तो प्रकल्प आणताना येथील जनतेशी कसे वागलो होतो ते आठवावे मगच सेनेवर टीका करावी, अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला. मागील आठवड्यात राजापुरात पार पडलेल्या भूमीकन्या एकता मंचाच्या मोर्चाला आपल्यासह आमदार राजन साळवी यांना बोलावले गेले नव्हते. त्यामुळे आम्ही उपस्थित नव्हतो. मात्र, आमचे स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला आ. राजन साळवी, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, उपजिल्हाप्रमुख  जगदीश राजापकर,   अवजड उद्योग सेनेचे सरचिटणीस दिनेश जैतापकर, जि. प. शिक्षण सभापती दीपक नागले, सभापती सुभाष गुरव, पंचायत समिती सदस्य अभिजीत तेली, प्रकाश गुरव, शरद लिंगायत, विभाग संघटक उमेश पराडकर, जया माने व अन्य मान्यवर उपस्थीत होते.

कोकण गिळंकृत करण्याचा भाजपचा डाव

रिफायनरी प्रकल्पाविरोधात लढणार्‍या जनतेच्या पाठीशी शिवसेना राहिली आहे. आमचा लढा हा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नसतो तर कोकणवासियांच्या भवितव्यासाठी आहे. असे बजावताना कोकणला लाभलेल्या समुद्राचा आधार घेऊन परप्रांतीय उद्योगपतींसह सौदीच्या व्यापार्‍यांना सोयीचे ठरेल असे धोरण ठरवून संपूर्ण कोकण गिळंकृत करण्याचा डाव शासनाचा आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. 

मात्र, तो शिवसेना हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार राऊत यांनी दिला. त्यासाठी प्रसंगी शिवसेना स्वतंत्र चळवळ उभी करील व त्यामाध्यमातून आंदोलने करु, असेही त्यांनी स्पष्ट केले.