Fri, May 24, 2019 02:26होमपेज › Konkan › कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्‍न सुटणार

कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्‍न सुटणार

Published On: Jul 22 2018 10:35PM | Last Updated: Jul 22 2018 8:36PMरत्नागिरी : शहर वार्ताहर

कायम विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. शिक्षकांच्या वेतनाच्या प्रश्‍नाबरोबरच अन्य मागण्या सोडविण्यासाठी निश्‍चित प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिक्षक आ. ना. गो. गाणार व आ. निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने नागपूर येथे मुख्यमंत्र्यांबरोबर शिक्षकांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली.

सेवाग्राम ते नागपूर 105 किलोमीटरचे अंतर पायी दिंडी काढून शेकडो शिक्षकांनी विधानभवनावर मोर्चा काढला. पोलिस प्रशासनाने रस्त्यावर मोर्चा अडवल्यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मात्र, त्याची दखल घेतली जात नव्हती. या संदर्भात शिक्षकांनी शासनाकडे इच्छामरणाची मागणी केली. यावेळी शिक्षक आ. ना. गो. गाणार व कोकण पदवीधर मतदारसंघातील आ. निरंजन डावखरे यांनी पुढाकार घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. तसेच शिक्षकांच्या मागणीविषयी ठोस भूमिका घेण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे व उच्च माध्यमिक विनाअनुदानित कृती समितीचे तानाजी नाईक यांची शिष्टमंडळासह बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिक्षकांच्या मागण्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले. 

शिक्षकांच्या प्रश्‍नाबाबत सहानुभूती : आ. डावखरे

कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत आपल्याला सहानुभूती आहे.  शिक्षकांचे सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी आ. गाणार यांच्यासह आपण सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत, असे आ. डावखरे यांनी सांगितले.