Mon, Jan 27, 2020 11:11होमपेज › Konkan › कोकण रेल्वेचे प्रश्‍न प्राधान्याने अजेंड्यावर

कोकण रेल्वेचे प्रश्‍न प्राधान्याने अजेंड्यावर

Published On: Jun 15 2019 1:47AM | Last Updated: Jun 14 2019 10:30PM
चिपळूण : प्रतिनिधी

कोकण रेल्वे संदर्भात जनतेच्या मागण्या व अपेक्षा दीर्घकाळ प्रलंबित आहेत. या सर्व बाबींची कोकण रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. कोणतीही हेळसांड खपवून घेतली जाणार नाही. कोकणातील जनतेच्या त्यागावर व सहकार्यावरच हा प्रकल्प उभा राहिला आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कोकण रेल्वे प्रशासनाने विषय मार्गी लावावेत, असे निर्देश रायगडचे खा. सुनील तटकरे यांनी कोकण रेल्वेचे  चेअरमन  अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्‍ता यांना दिले.

आपल्या प्रचारादरम्यान रायगड व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील जनतेने रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांकडे तटकरेंचे लक्ष वेधले होते व हे विषय प्राधान्याने आपण हाताळू, असा निर्वाळा त्यांनी दिला होता. लोकसभा सदस्यत्वाचा शपथविधी होण्याआधीच सुनील तटकरे यांनी थेट कोकण रेल्वे भवनवर धडक दिली व श्री. गुप्‍ता यांची भेट घेऊन त्यांच्याशी कोकणातील रेल्वे प्रवास व अन्य प्रश्‍नांबाबत दीर्घकाळ चर्चा केली. यावेळी पनवेल-चिपळूण ही ईएमओ रेल्वे सुरू करणे, खेड रेल्वे स्थानकात महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळण्यासोबतच चिपळूण स्थानकात सर्व गाड्यांना थांबा मिळावा,  शिरवली रेल्वे स्थानक, चिपळूणजवळील कळंबस्ते या दोन्ही रेल्वे क्रॉसिंगवर ओव्हरब्रिज, कोलाड रायगड येथील रेल्वे प्‍लॅटफॉर्मची उंची वाढविणे, चिपळूण रेल्वे स्थानकातील प्रवासी सुविधा व स्थानकामध्ये अद्ययावत सुविधांची पूर्तता करणे, कोकण रेल्वे भरतीत स्थानिकांना प्राधान्य,शिवाय कोकणातील रेल्वे प्रवाशांना प्रवासामधील सुरक्षितता या बाबींकडे त्यांनी लक्ष वेधले. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या प्रवाशांसाठी चिपळूण, रत्नागिरी व सावंतवाडी अशा तीन टप्प्यांवर विशेष गाडी सुरू करणे आदीबाबत त्यांनी आग्रही भूमिका घेतली. रेल्वे प्रशासनाने खा. तटकरे यांच्या विविध मागण्यांबाबत रेल्वे मंत्रालयाला प्रस्ताव पाठविण्याबाबत मंजुरी दर्शवली आहे. कोकण रेल्वे संदर्भातील प्रश्‍न रेल्वे प्रशासनाने अग्रक्रमाने हाताळावेत. आपण या बाबत सातत्याने पाठपुरावा करणार असून कोणत्याही परिस्थितीत हे प्रश्‍न मार्गी लागायला हवेत, असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले. या संदर्भात मुंबईत कोकण रेल्वे व मध्य रेल्वे यांच्या वरिष्ठ स्तरावरील अधिकार्‍यांसोबतही महत्त्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय मार्गी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, खा. सुनील तटकरे यांनी खासदारपदाची शपथ घेण्यापूर्वीच कोकण रेल्वेतून प्रवास करणार्‍या प्रवाशांना व केवळ रत्नागिरी, रायगडपुरता हा विषय न हाताळता  थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांनाही सुसह्य प्रवास व प्रवासी सुविधा व प्रश्‍नांबाबत आपण आक्रमक भूमिका घेणार असल्याचे ‘पुढारी’शी बोलताना खा. तटकरे यांनी सांगितले.