Mon, Aug 19, 2019 07:47होमपेज › Konkan › तळेबाजार येथे मराठा बांधवांनी केले ‘मुंडन’

तळेबाजार येथे मराठा बांधवांनी केले ‘मुंडन’

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 10:36PMदेवगड : प्रतिनिधी

सकल मराठा समाजाने पुकारलेल्या सिंधुदुर्ग बंदला देवगड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बंदमुळे देवगड तालुक्यातील बाजारपेठा, शाळा, कॉलेज, वाहतूक सेवाही बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. शिरगाव- पावणाई मंदिराजवळ रस्त्यावर झाड तोडून टाकल्याने तर, देवगड कॉलेजनाका, तळेबाजार बाजारपेठ, वाडा चांभारघाटी व शिरगाव बाजारपेठ या ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून व ठिय्या आंदोलन करीत रस्ता रोखून धरल्यामुळे वाहतूक  ठप्प होती.तळेबाजारमध्ये मुंडन आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला.

देवगड कॉलेज नाका मराठा समाज बांधवांनी सकाळी 7 वा. पासून आंदोलनाला सुरूवात करत रस्त्यावर टायर जाळून व ठिय्या आंदोलन करून रस्ता रोखून धरला.यामुळे सकाळी देवगडला येणार्‍या वस्तीच्या 15 ते 20 गाड्या कॉलेजनाका ते डायमंड हॉटेलपर्यंत थांबून होत्या. महाविद्यालयामध्ये  येणार्‍या विद्यार्थ्यांनाही या आंदोलनाचा फटका बसला. तालुक्यातील बहुतांशी शाळा, कॉलेज बंद  होते.

देवगड कॉलेजनाका येथे उद्योजक प्रकाश गायकवाड, निशिकांत साटम, नगरसेवक उमेश कणेरकर, प्रवीण वातकर, नगरसेविका प्रणाली माने, रंजना कदम आदी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या आंदोलनाला नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर व माजी नगराध्यक्ष प्रियांका साळसकर, न.पं.आरोग्य सभापती बापू जुवाटकर आदींनी सहभाग घेवून पाठींबा दर्शविला.कॉलेजनाका येथे  छेडण्यात आलेल्या आंदोलनात मराठा समाजाचे  कॉलेज विद्यार्थीही सहभागी झाले होते. काकासाहेब शिंदे अमर रहे, एक मराठा लाख मराठा, आरक्षण मिळालेच पाहिजे या घोषणांनी कॉलेजनाका परिसर दुमदुमून गेला होता. पोलिस निरिक्षक सुधीर शिंदे हे पोलिस कर्मचार्‍यांसहीत आंदोलनस्थळी उपस्थित होते.

वाडा - चांभारघाटी येथेही देवगड - विजयदुर्ग रस्त्यावर मराठा बांधवांनी टायर जाळून आंदोलन छेडले. यामुळे विजयदुर्ग मार्ग बंद होता. पडेल कॅन्टिन बाजारपेठ बंद ठेवून व्यापार्‍यांनी बंदला पाठिंबा दिला.यामुळे पडेल कॅन्टिन येथे गुरूवारी भरणारा आठवडा बाजारही भरला नाही. पूरळ, पडेल, शिरगाव, मिठबाव, फणसगाव, तळेबाजार या  तालुक्यातील मुख्य बाजारपेठा बंद होत्या.

तळेबाजारमध्ये मुंडण आंदोलन

तळेबाजार येथेही देवगड- नांदगांव मुख्य रस्त्यावर टायर जाळून मराठा समाज बांधवांनी आंदोलन छेडले.मराठा समाजाच्यावतीने घोषणाबाजी करून रॅली काढण्यात आली.तळेबाजारमध्ये गुरूवारी भरणारा आठवडा बाजारही बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. मराठा समाज बांधवांच्यावतीने दत्तप्रसाद जोईल, शांताराम कदम, दीपक धुरी यांनी मुंडन करून शासनाचा निषेध केला.