Thu, Jul 18, 2019 08:05होमपेज › Konkan › नारळ क्षेत्र वाढविण्यासाठी प्रक्रिया उद्योग सक्षम हवा

नारळ क्षेत्र वाढविण्यासाठी प्रक्रिया उद्योग सक्षम हवा

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 02 2018 9:51PMरत्नागिरी : शहर वार्ताहर

नारळ पिकाखालील क्षेत्र वाढविण्याकरिता व प्रक्रिया उद्योग सक्षम करणे गरजेचे असल्याचे कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी सांगितले. भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अधिनस्त प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 2 सप्टेंबर रोजी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये येथे जागतिक नारळ दिन कार्यक्रम पार पडला. या निमित्त प्रात्यक्षिक व प्रदर्शन तसेच शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी  माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर होते. त्यांनी नारळ पिकाखालील क्षेत्र वाढविण्याकरिता व प्रक्रिया उद्योग सक्षम करणे या विषयी  उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उपस्थितांना प्रक्रिया उद्योग गतिमान करणे आवश्यक असल्याचे सांगितले. 

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून नारळ विकास बोर्डाचे माजी उपाध्यक्ष, राजाभाऊ लिमये, श्रीफळ उत्पादक हितवर्धक संघाचे अध्यक्ष डॉ. अनिल जोशी, कृषी विकास अधिकारी आरिफ शहा  आदी उपस्थित होते. मान्यवरांनी नारळ दिनानिमित्त शेतकर्‍यांना शुभेच्छा देवून नारळ पिकाखाली जास्तीत-जास्त क्षेत्र कसे आणता येईल व नारळाचे मूल्यवर्धित पदार्थ कसे तयार करता येईल, याविषयी संशोधन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक कृषिविद्यावेत्ता डॉ. प्रकाश सानप यांनी केले. यानिमित्त आयोजित शेतकरी, शास्त्रज्ञ सुसंवाद या कार्यक्रमाचे महत्त्व येथील आत्माचे उपसंचालक गुरूदत्त काळे यांनी विशद केले.  
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किटकशास्त्रज्ञ तथा समन्वयक डॉ. संतोष वानखेडे यांनी केले. आभार डॉ. सुनील घवाळे यांनी मानले.

या  कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य महिला व पुरूष शेतकरी तसेच उद्योजक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये येथील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच आत्मा व कृषी विभाग येथील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी योगदान दिले.