होमपेज › Konkan › समुद्रीमार्गे गोवा बनावट दारू वाहतुकीची शक्यता!

समुद्रीमार्गे गोवा बनावट दारू वाहतुकीची शक्यता!

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 16 2018 10:46PMसिंधुदुर्ग : गणेश जेठे

मोर्वे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एका टोकावर समुद्र किनार्‍यावर वसलेले हे गाव आहे. हिंदळेपासून चार कि.मी. अंतरावर असलेल्या या निसर्गरम्य गावात तब्बल दीड लाख रु. किंमतीचा गोवा बनावटीचा मद्य साठा सापडला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा साठा या गावात सापडल्यामुळे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक समुद्रीमार्गे झाली असावी अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्यावरून एवढा मोठा दारूसाठा घेवून वाहतूक करत मोर्वेपर्यंत पोहोचणे कठीण आहे.

आजवर गोवा बनावटीच्या दारूची सिंधुदुर्गातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर झाली आहे आणि होतही आहे. महिन्यातून एक-दोन कारवाया हमखास होत आहेत. परंतु अलिकडच्या कारवायांचे बारीक विश्‍लेषण केल्यास एक लक्षात येईल की चेक नाक्यांवर गाड्यांमधील साठा जप्त करण्यापेक्षा प्रत्यक्ष विक्रीच्या स्थळांवर जावून गोवा बनावट दारूचे साठे जप्त केले जात आहेत. मग ती वारंवार होणारी सुकळवाडमधील कारवाई असो किंवा आता मोर्वेची. याचाच अर्थ जिल्हा पोलिस अधीक्षकांनी चेकनाक्यांवरील पोलिस कर्मचारी कितीवेळा बदलले तरी तेच तेच घडते आहे. ही परिस्थिती असतानाही किनार्‍यावरील एका गावामध्ये मोठा साठा सापडल्यामुळे समुद्रीमार्गे वाहतूक होत असल्याचा अंदाज आता बांधला जात आहे. 

भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील काहीशी दक्षिणेकडील भागात सिंधुदुर्ग आणि गोव्याचा समुद्र किनारा येतो. हे दोन्ही किनारे एकमेकाला लागून आहेत. गोव्यामध्ये दारू निर्मितीवरील उत्पादन शुल्क महाराष्ट्राच्या तुलनेत कितीतरी पट म्हणजे केवळ 15-20 टक्के इतकेच आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील तूट भरून काढण्यासाठी मद्यावरील कर दरवर्षी वाढविले जातात. त्याचा परिणाम वाढत्या किंमतीमध्ये होतो. परंतु या उलट गोवा सरकार पर्यटकांना आपल्या राज्यात खेचण्यासाठी मद्याच्या उत्पादन शुल्काला अजिबात हात लावत नाही. परिणामस्वरूप गोव्याच्या मद्याच्या किंमती कायम नियंत्रणात राहत आहेत. यामुळेच गोव्यातील स्वस्त किंमतीतील दारू महाराष्ट्रामध्ये आणि गोव्याच्या हद्दीवरील कर्नाटक व केरळ राज्यामध्ये बेकायदेशीररित्या वाहतूक होते. महाराष्ट्रातील दर अधिक असल्यामुळे महाराष्ट्रात वाहतूक होण्याचे प्रमाण अधिक आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा या वाहतुकीचे प्रवेशद्वार आहे. पोलिसांचे चेकनाके इन्सुली, आरोंदा, तेरेखोल या ठिकाणी आहेत. परंतु तरीही गोवा बनावटीचा मद्यसाठा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतोच आहे. 

मोर्वे हे इन्सुलीपासून जवळपास 100 कि.मी. अंतरावर आहे. एवढे अंतर पार करून सिंधुदुर्ग पोलिसांना चकवून एवढा मोठा मद्यसाठा मोर्वेमध्ये पोहोचतोच कसा? हा प्रश्‍न आहे. कदाचित त्यामुळेच गोव्यातून मद्यसाठा बोटीद्वारे वाहतूक करून मोर्वेमध्ये पोहोचवला जावू शकतो. पोलिसांच्या गस्तीनौकांनी त्यासाठी सतर्क रहाणे आवश्यक आहे. परंतु पोलिसांच्या गस्तीनौका अशा वाहतुकीवर लक्ष ठेवतात की नाही हा प्रश्‍न आहे. तशा सूचना आणि आदेश गस्तीनौकांवरील पोलिसांना जायला हवेत. पोलिसांसमोर मद्यसाठ्याची वाहतूक समुद्रीमार्गे झाली तर ती रोखण्याचे आव्हान आहेच. परंतु ते आव्हान पोलिसांनी स्विकारून त्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी आता होत आहे.