Wed, Apr 24, 2019 15:39होमपेज › Konkan › जिल्ह्यात कुणबी सेनेची काँग्रेसला समांतर संघटना

जिल्ह्यात कुणबी सेनेची काँग्रेसला समांतर संघटना

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 10:51PM

बुकमार्क करा

चिपळूण : खास प्रतिनिधी

जिल्ह्यात काँग्रेसला समांतर कुणबी सेनेची संघटना उभी राहत आहे. कुणबी सेनेचे ज्येष्ठ नेते विश्‍वनाथ पाटील हे दुहेरी भूमिका बजावत असून, जिल्ह्यात काँग्रेसला समांतर असे कुणबी सेनेचे जाळे विणले जात आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यांचे सुपुत्र माजी खासदार नीलेश राणे हे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या चिन्हावरच निवडून आले. काँग्रेसचे कोकणचे नेते म्हणून नारायण राणे यांनी नेतृत्व केले. मात्र, आता त्यांच्यानंतर काँग्रेसकडून कोकणच्या नेतृत्वाची धुरा खा. हुसेन दलवाई यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात रत्नागिरी जिल्हा प्रभारी म्हणून काँग्रेसने कुणबी सेनेचे विश्‍वनाथ पाटील यांची निवड केली. त्यानंतर ते सातत्याने जिल्हा दौरा करीत आहेत. तालुकावार बैठका आणि काँग्रेस कार्यकर्त्यांशी संपर्क सुरू आहे. दुसर्‍या बाजूला विश्‍वनाथ पाटील यांनी कुणबी सेना संघटनेचे कामही सुरू ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला समांतर अशी कुणबी सेनेची उभारणी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

दोनच दिवसांपूर्वी विश्‍वनाथ पाटील यांनी चिपळूण येथे कुणबी सेनेची जिल्हा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्हाप्रमुख म्हणून दादा बैकर यांची निवड केली. याशिवाय प्रत्येक तालुक्यात संपर्कप्रमुख नेमले. पुढच्या टप्प्यात तालुकाप्रमुख नेमण्यात येणार आहेत. जिल्ह्यामध्ये साठ टक्के कुणबी समाज आहे.