Mon, Aug 19, 2019 13:26होमपेज › Konkan › एलएनजी टर्मिनलमुळे उद्योगांना विकासाची संधी 

एलएनजी टर्मिनलमुळे उद्योगांना विकासाची संधी 

Published On: May 03 2018 1:29AM | Last Updated: May 02 2018 10:56PMरत्नागिरी : प्रतिनिधी

देशातील पहिल्या फ्लोटिंग स्टोरेज रि-गॅसिफिकेशन युनिटच्या ‘एलएनजी’ टर्मिनलमुळे बंदरांवर आधारित उद्योगांना विकासाच्या नवीन संधी मिळणार आहेत. देशाला या प्रकल्पामुळे महाराष्ट्रदिनी एकप्रकारे नवीन व्यवस्था मिळाली आहे. या प्रकल्पामुळे देशातील पायाभूत सुविधा वाढणार आहेत. त्यामुळे देशाला या प्रकल्पाच्या रुपाने नवे दालन तयार झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जयगड येथे ‘एलएनजी’ टर्मिनलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी ते बोलत होते. 

या कार्यक्रमाला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा. विनायक राऊत, आ. उदय सामंत,  हिरानंदानी समूहाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, मॅनेजिंग डायरेक्टर दर्शन हिरानंदानी, जिंदल समूहाचे सज्जन जिंदल आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी ना. फडणवीस पुढे म्हणाले, जयगड बंदरावरील ‘एलएनजी’ टर्मिनल प्रकल्प केवळ 17 महिन्यांत पूर्ण झाला असून अल्पावधीत तो कार्यान्वित होणार आहे. देशाला ‘एलएनजी’ची गरज असून या प्रकल्पामुळे बंदरांवर आधारित स्थानिक उद्योगांचा विकास शक्य होणार आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणार्‍या दरातील नैसर्गिक वायूची गरज ‘एलएनजी’ टर्मिनल भागविणार आहे. परिवहन व घरगुती वापरासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध करून देत असल्याने एच-एनर्जीच्या ‘एलएनजी’ टर्मिनलमुळे महाराष्ट्रालाही खूप फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे दाभोळ प्रकल्पही कायमस्वरुपी सुरु राहील. जयगडपासून दाभोळपर्यंत गॅस पाईपलाईन जाणार असल्यामुळे गॅस पोहोचविणारा रत्नागिरी हा पहिला जिल्हा ठरला असल्याचेही ते म्हणाले. 

याप्रसंगी ना. अनंत गिते म्हणाले की, जयगड पोर्ट हे जिल्ह्यासाठी पर्यायाने राज्यासाठी वरदान ठरणारे आहे. सर्व ॠतुंमध्ये सुरु राहणारे असे हे बंदर असून या बंदरात अत्याधुनिक असा ‘एलएनजी’ प्लांट उत्तम टेक्नॉलॉजी वापरुन कार्यान्वित होत आहे, ही आनंदाची बाब आहे. वार्षिक 4 एमएमटीपीए क्षमता असलेले एच-एनर्जीचे ‘एलएनजी’ टर्मिनल जागतिक दर्जाच्या इंजिनिअरिंग व सेफ्टी स्टँडर्डचा अवलंब करून बनविण्यात आले आहे. हा प्रकल्प करताना स्थानिकांना सोबत घ्यावे, असे आवाहनही गिते यांनी केले.  यावेळी हिरानंदानी समूहाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी  म्हणाले, देशातील पहिले एफएसआरयु आधारित टर्मिनल उभे करणे ही आमच्या कंपनीसाठी अभिमानाची बाब आहे. पहिला ‘एलएनजी’ टर्मिनल वेळापत्रकानुसार पूर्ण होते आहे. याच वेगाने आम्ही आमच्या इतर प्रकल्पांवरदेखील काम करत राहू. भारतीयांचे आयुष्य समृद्ध करणार्‍या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठीची आमची कटिबद्धता आम्हाला इथे पुन्हा व्यक्‍त करायची आहे.

Tags : Konkan, opportunities, industries,  grow, due, LNG, terminal