Sun, Aug 25, 2019 08:35होमपेज › Konkan › जिल्ह्यात लेप्टो रुग्णांचा आकडा 26 वर

जिल्ह्यात लेप्टो रुग्णांचा आकडा 26 वर

Published On: Aug 31 2018 1:39AM | Last Updated: Aug 30 2018 11:08PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून लेप्टोस्पॉयरोसिसचे 26 बाधित रुग्ण आढळून आले. लेप्टोसह डेंग्यूचेही रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. या रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, लेप्टोचे रुग्ण आढळलेल्या भागात सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या आहेत.

जानेवारीपासून आतापर्यंत लेप्टोचे 26 रुग्ण सापडले आहेत. गुहागर 1, चिपळूणमध्ये 2, संगमेश्‍वरमध्ये 7, रत्नागिरी 12, लांजा 1 आणि राजापूर तालुक्यात तीन रुग्ण सापडले आहेत. लेप्टोस्पायरोसिची लक्षणे आढळून आल्याने संशयित रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संशयित रुग्णांचे रक्‍त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानुसार 26 जणांना लेप्टोची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

लेप्टोस्पॉयरोसिस हा रोगबाधित प्राणी मुख्यत: उंदीर, डुक्‍कर, गाय, म्हैस, कुत्रा यांच्या लघवीद्वारे जंतू बाहेर पडतात. या प्राण्यांचे लघवीचे दूषित झालेले पाणी, माती यांचा मानवाच्या त्वचेशी संपर्क आल्यास (त्वचेवर जखम असल्यास) हा रोग होतो. या रोगाचे निदान रक्‍त, लघवी प्रयोगशाळेमध्ये तपासून करता येते. आरोग्य विभागातर्फे सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजलेले असून आरोग्य शिक्षण, सर्वेक्षण इत्यादी कार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आलेले आहे. तसेच जिल्ह्यामध्ये सर्व आरोग्य केंद्रे, जिल्हा शासकीय रुग्णालय या ठिकाणी या आजारावरील औषध साठा ठेवल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.