Mon, Oct 21, 2019 03:48होमपेज › Konkan › विस्कळीत सेवेला ‘कोस्टल वे’चा पर्याय

विस्कळीत सेवेला ‘कोस्टल वे’चा पर्याय

Published On: May 18 2018 1:17AM | Last Updated: May 17 2018 11:02PMरत्नागिरी : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे केबल तुटल्याने अनेक वेळा बीएसएनएलची इंटरनेट सेवा खंडित होत आहेत. त्यामुळे ही सेवा वापरणार्‍यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा काढताना सागरी महामार्गावरून नवीन ‘कोस्टल वे’ तयार करण्यात आला असून, केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या आठ दिवसांत ही यंत्रणा कार्यान्वित होऊन इंटरनेट सुविधा सुरळीत होईल, अशी माहिती बीएसएनएलचे उपविभागीय नियोजन अभियंता योगेश भोंगले यांनी दिली.

बीएसएनएलचे रत्नागिरी-मुंबई, रत्नागिरी-कोल्हापूर आणि रत्नागिरी-सावंतवाडी हे मुख्य रूट आहेत. या तिन्ही रूटवर रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे करताना बीएसएनएलची केबल ठिकठिकाणी तुटते. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा ठप्प होते. काहीवेळा तर ही सेवा 12 तास ठप्प असते. यामुळे या सेवेवर अवलंबून असणार्‍यांची मोठी गैरसोय होते. याबाबत जिल्हाधिकारी, चौपदरीकरणाचे  काम घेतेलेले कंत्राटदार आणि बीएसएनएलचे अधिकारी यांची नुकतीच संयुक्‍त बैठक झाली असून, या बैठकीत कंत्राटदाराने केबल तुटल्यास तातडीने बीएसएनएलला सुचित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. महामार्गावर काम सुरू असणार्‍या चार ठिकाणी बीएसएनएलचे कर्मचारी नियुक्‍त करण्यात आले असून, केबल तुटल्याचे कळल्यास ते तातडीने त्याची दुरूस्ती करत आहेत. हे काम 24 तास सुरू आहे. 

बीएसएनएल आपल्या ग्राहंकाप्रती जागरुक असून, यावर तोडगा काढण्यासाठी सागरी महामार्गावर नवा कोस्टल वे तयार करण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात या मार्गावरून सेवा सुरू होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर नवीन केबल टाकण्यासाठी 33 कोटींची आवश्यकता आहे. मात्र, शासनाने निधी न दिल्याने बीएसएनएल आपल्याच खर्चातून टप्प्याटप्प्याने हे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19