Tue, Jul 16, 2019 00:18होमपेज › Konkan › नैसर्गिक आपत्ती हे ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे संकट : आदित्य पुंडीर 

नैसर्गिक आपत्ती हे ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे संकट : आदित्य पुंडीर 

Published On: Aug 19 2018 1:32AM | Last Updated: Aug 18 2018 8:50PMसावंतवाडी : प्रतिनिधी

जगामध्ये उद्भवत असलेल्या विविध नैसर्गिक आपत्ती हे जागतिक  ग्लोबल वोर्मिंगचे संकट आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी मानवाने आता अनुकूल झाले पाहिजे, असे प्रतिपादन क्लायमेट रियालिटी प्रोजेक्ट इंडियाचे कंट्री मॅनेजर आदित्य पुंडीर यांनी केले. 

सावंतवाडी श्री पंचम खेमराज महाविद्यालयात क्लायमेट प्रोजेक्ट फाउंडेशन नवी दिल्ली व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या विद्यामाने ‘जागतिक हवामान बदल आणि शाश्‍वत विकास’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत सौ. शुभदादेवी भोसले, प्रोजेक्ट ऑफिसर शीतल अंतील, डिस्ट्रिक्ट मॅनेजर डॉ.नंदिनी देशमुख, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांच्यासह अन्य उपस्थित होते.

पुंडीर यांनी जागतिक हवामान बदलाचा परिणाम आपल्या पी. पी. टी. प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दाखवले.  आता जागतिक ग्लोबल वोर्मिंगमुळे हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. त्यामुळे अवेळी पाऊस, भूकंप, सुनामी, चक्रीवादळ आदी  नैसर्गिक आपत्तीसारखे संकट उद्भवत आहेत.  जगामध्ये झाडांची तोड वाढत चालली असून ग्लोबल वोमिंगचे संकट आता कमी होण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यासाठी मानवाने आता मनाची तयारी करून हे संकट पेलण्यासाठी अनुकूलता दाखवावी, असे आवाहन केले. या संकटाची तीव्रता कमी व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे त्यांना जोपासणे, जंगलमय भागांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.

डॉ. नंदिनी देशमुख यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी नैसर्गिक साधन संपत्ती हेच आपले खरे गोल्ड असून त्याचे जतन केले पाहिजे. माणसाने आपल्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे. त्यात वीज, इंधन, पाणी यांचा कमीत कमी वापर करणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.श्रीमंत सौ. शुभंदादेवी भोसले यांनी ग्लोबल वोर्मिंग ही जागतिक समस्या असून त्याबाबत वेगाने प्रचार सुरू झाला आहे. ही समस्या सर्वांना समजावी यासाठी ही कार्यशाळा आयोजित केल्याचे सांगितले.