होमपेज › Konkan › ‘मांडवी’वर सापडलेल्या ‘त्या’ तरुणाची हत्या?

‘मांडवी’वर सापडलेल्या ‘त्या’ तरुणाची हत्या?

Published On: Aug 17 2018 10:34PM | Last Updated: Aug 17 2018 10:28PM



रत्नागिरी : वार्ताहर

मुंबईतील समीर वणू याची मांडवीत हत्याच केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस यंत्रणा पोहोचली आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. प्रेमप्रकरणातून समीरचा काटा काढण्यात आला असावा, असा संशय व्यक्‍त करण्यात येत आहे. 

सुमारे महिनाभरापूर्वी मुंबई गोवंडी येथे दोन गटांत राडा झाला होता. त्यानंतर समीरसह त्याच्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई न्यायालयात समीरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्यानंतर तो रत्नागिरीत भावाकडे आला होता. लोकेशन मिळू नये यासाठी त्याने मोबाईल वापरणेही टाळले होते. 

11 ऑगस्टला रात्रीच्या सुमारास समीर व त्याचा मुंबईतला भाऊ दोघेही मुंबईला जाण्यासाठी घराबाहेर पडले. तू पुढे जा, मी रेल्वे स्टेशनला येतो, असे समीरने आपल्या लहान भावाला सांगितले. रात्री 12.30 पर्यंत समीर रेल्वेस्थानकात न पोहोचल्याने दुसरा भाऊ रेल्वेने मुंबईला पोहोचला. 

सोमवारी सकाळी समीरचा मृतदेह मांडवी नजीकच्या समुद्रकिनारी आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर चौकशीअंती तो समीर वणूचा असल्याचे निष्पन्‍न झाले. मंगळवारी समीरच्या भावाने आत्महत्या नसून त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्‍त केला होता. सर्व नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसांनीही खोलवर चौकशी केली.