Sat, Jul 20, 2019 09:30होमपेज › Konkan › पोलिसांनी परवानगी नाकारल्याने स्वराज्य संघटना आक्रमक

भिडे गुरुजींची सभा होणारच!

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 22 2017 9:13PM

बुकमार्क करा

सावंतवाडी : प्रतिनिधी

न. प. च्या परवानगीनंतर पोलिसांनी परवानगी नाकारल्याने सावंतवाडी स्वराज्य संघटनेच्यावतीने शनिवारी आयोजित शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे यांची सभा गांधी चौकातच होणार असल्याचे स्वराज्य संघटनेचे सोमनाथ गावडे यांनी  पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

शनिवार 23 रोजी नाताळ निमित्त ख्रिस्ती बांधवांची मिरवणूक असल्यामुळे आम्ही या सभेसाठी परवानगी नाकारल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, प्रभारी पोलिस निरिक्षक अरुण जाधव हे नाहक दोन धर्मात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप स्वराज्य संघटनेचे सुनील पेडणेकर यांनी केला. काहीही झाले तरी आम्ही सभा घेणारच. त्यावेळी शांतता बिघडल्यास पोलिस श्री. जाधव हे अधिकारी जबाबदार रहातील, असा इशारा या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिला.

अमोल साटेलकर, श्रीपाद सावंत, महेश पांचाळ, अजित सांगेलकर, नंदू कदम, कृष्णा धुळपनावर आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संघटनेच्यावतीने दीड महिन्यापूर्वी श्री. भिडे यांच्या सभेसाठी  न. प.  कडून परवानगी घेतली होती. त्यानंतर आम्ही सभेचे सर्व नियोजन केलेे; मात्र, आज स्पिकर परवानगी घेण्यासाठी  कार्यकर्ते पोलिस स्थानकात गेले असता, सभा स्थळावरुन  ख्रिस्ती धर्मीयांची मिरवणूक जाणार असल्यामुळे सभेस परवानगी नाकारत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे पदाधिकारी म्हणाले, सावंतवाडी तालुक्यात हिंदू व ख्रिश्‍चन धर्मियांमध्ये   कोणताही वाद नाही. मात्र, धर्माचे नाव पुढे करुन या ठिकाणी प्रभारी  पोलिस अधिकारी अरुण जाधव हे राजकारण करू पाहत आहेत. त्यांच्या विरोधात या पूर्वी संघटनेने पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली होती. त्याचा राग आता ते काढत आहेत. भविष्यात कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी पोलिस अधिकारी जाधव हे जबाबदार राहतील, असे पेडणेकर यांनी या पत्रकारपरिषदेत स्पष्ट केले.