Wed, Jun 26, 2019 11:27होमपेज › Konkan › जुन्या नोटा प्रकरणातील मुख्य सूत्रधार अजूनही फरार

जुन्या नोटा प्रकरणातील मुख्य सूत्रधार अजूनही फरार

Published On: Aug 21 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 10:23PMसावंतवाडी  : प्रतिनिधी 

शहरातील माठेवाडा येथील सुमारे एक कोटीच्या जुन्या नोटा प्रकरणातील  मुख्य सूत्रधार विजय परब हा अद्यापही फरार असून  सावंतवाडी पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांना याप्रकरणातील संबंधितांची चौकशी  करण्यास सावंतवाडी न्यायालयाने परवानगी दिली आहे. ही रक्‍कम संशयितांनी आणली कुठून? आणि ही रक्‍कम  कोणाला दिली जात होती याची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने शनिवारी 18 ऑगस्ट च्या रात्री जप्त केलेला एक कोटी रुपये किमतीच्या चलनातून बाद झालेल्या जुन्या एक  हजार आणि पाचशे रुपयाच्या नोटा प्रकरणी मडुरा, माजगाव व  बांदा येथील तिघाजणांना ताब्यात घेण्यात आले होते. यात  शंभा रत्नाकर भिंगी (45, रा. बांदा), मिलींद मधुकर सावंत (40,रा. माजगाव दळवीवाडी) आणि सोमनाथ बळीराम  परब (40, रा. मडुरा) यांचा समावेश आहे. यातील शंभू भिंगी याचे इन्सुली येथे हॉटेल आहे. शंभू आणि मिलिंद सावंत या दोघांनी बांदा येथून  एक कोटी रुपये बॅगमध्ये  भरून रक्‍कम आणली. सोमनाथ परब आणि मुख्य सूत्रधार विजय परब या दोघांची मैत्री आहे. विजयने सोमनाथला कुणाकडे जुन्या चलनातून बाद झालेल्या नोटा असतील तर आणून दे, आपल्याकडे गिर्‍हाईक आहे व  एक कोटी रुपयांना 25 लाख रुपये नव्या चलनातील नोटा देईल त्यावर कमिशन सुद्धा मिळेल असे सांगितले होते. मात्र शंभा भिंगी आणि मिलिंद सावंत या दोघांना मुख्य सूत्रधार विजय परब यांच्यात ओळखत नसल्याचे तपासामध्ये निष्पन्‍न झाले आहे. मात्र, रक्‍कम घेऊन हे चौघेही एकत्र आल्यानंतर त्यांची गवळीतिठा येथे प्रथमच  ओळख झाली होती 

जप्त करण्यात आलेल्या 1000 रुपयांच्या 25 हजार आठ नोटा म्हणजेच 85 लाख आठ हजार रुपये गुन्हा अन्वेषण विभागाने घातलेल्या छाप्यात आढळून आले. तर पाचशे  रुपयांच्या 29 हजार 268 नोटा म्हणजेच 14 लाख 84 हजार रुपये असे मिळून एकूण सुमारे एक कोटी रुपयांच्या जुन्या चलनातील नोटा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केल्या होत्या. याशिवाय  संशयितांकडून दोन दुचाकी आणि मोबाईल जप्त केले आहेत 

गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी शंभा भिंगी, मिलिंद सावंत व सोमनाथ परब या तिघांकडे रवीराज  फडणीसत्याला ग्राहक बनून कॉल केला व आपण ही रक्‍कम घेण्यास तयार असल्याचे सांगितले व या तिघांनाही रक्‍कमेसह सावंतवाडी येथे बोलावले असता हे तिघेही एकत्र आले व मुख्य सूत्रधार  विजय परब याच्या माठेवाडा येथील भाड्याच्या घरामध्ये बॅगमध्ये रक्‍कम घेऊन आले.यावेळी गुन्हे अन्वषण विभागाने धाड टाकून रकमेसह तिघांनाही ताब्यात घेतले. दरम्यान, मुख्य सूत्रधार विजय परब भाड्याच्या खोलीमध्ये राहत असून त्याच्या घराला कुलूप आहे. सोमनाथ  परब यांच्या समवेत पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण गवस यांनी  घरापर्यंत जाऊन शोध घेतला असता तो आढळून आला नाही. मुख्य सूत्रधार विजय परब हा रक्‍कम नेमकी कुणाला देणार होता? यापूर्वी त्याने असे देवघेवीचे  व्यवहार केले होते काय, याचा शोध पोलिस घेणार आहेत.

पोलिसांनी सुरुवातीला प्रथम या तिघांविरुद्ध बँक अ‍ॅक्ट पेसीफाईड नोटा अ‍ॅक्ट 2017 चे कलम पाच  व 7  अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सावंतवाडी न्यायालयाने आज दिलेल्या परवानगीनंतर तपासाअंती जुन्या नोटा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे.