Sun, May 19, 2019 14:28
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा चार तासात छडा 

अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा चार तासात छडा 

Published On: Aug 19 2018 11:05PM | Last Updated: Aug 19 2018 10:29PMभडकंबा : वार्ताहर

संगमेश्‍वर तालुक्यातील भोवडे पसिरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञाताकडून अपहरण झाल्याची तक्रार मुलीच्या आईने साखरपा पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा अवघ्या चारच तासात छडा लावला आहे.

याबाबत मुलीच्या आईची तक्रार दाखल होताच देवरूखचे पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखरपा येथील पोलिस उपनिरीक्षक विक्रम पाटील यांनी सहकारी संजय उकार्डे, प्रमोद वाघाटे, महिला पोलिस अपर्णा राधेय यांच्या पथकाने या मुलीचा शोध घेण्यास सुरूवात केली.  तपासादरम्यान साखरपा पोलिसांच्या पथकाने अल्पवयीन मुलीचा मोबाईल मिळवला असता अपहरणाची वेळ व मेसेजची वेळ यांची सांगड घालून मुलीपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. यानंतर चारच तासात पोलिसांनी मुलीचा छडा लावला. ही मुलगी भडकंबा परिसरातील एका घरामध्ये सापडली.

या प्रकरणी पोलिसांनी मिलिंद कांबळे याला ताब्यात घेऊन चौकशीअंती अटक केली. त्याला देवरूख न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली असून त्याची रवानगी रत्नागिरी येथील विशेष कारागृहात करण्यात आली आहे. या बाबात तपास पोलिस हे. कॉ. कमलाकर तळेकर करीत आहेत.  घटनेनंतर अवघ्या चारच तासात छडा लावल्याने पोलिसांची प्रशंसा होत आहे.